Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सरनाईकांची सूचना योग्यच ; आठवलेंची मुख्यमंत्र्यांना साद

 

मुंबई : वृत्तसंस्था । सरनाईक यांची सूचना योग्यच आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या चक्रातून बाहेर येऊन भाजपशी युती करावी, असं आवाहन रामदास आठवले यांनी केलं आहे

 

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजपबरोबर जुळवून घेण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलं आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी त्याचं स्वागत केलं आहे.

 

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून शिवसेना आणि भाजपने युती करावी अशी स्वागतार्ह भूमिका मांडली आहे. त्यांच्या या भूमिकेचे आपण स्वागत करीत असून उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी भाजपशी युती करावी, असे आवाहन आठवले यांनी केले.

 

 

काँग्रेस आणि राष्ट्रवादी जोडीच्या चक्रात उद्धव ठाकरे अडकले आहेत. दोन्ही काँग्रेसच्या दबावामुळे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना काम करणे अवघड होत आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी, छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार मजबूत करण्यासाठी शिवसेना-भाजपने एकत्र यावे, असं मतही त्यांनी व्यक्त केलं आहे.

 

काँग्रेस आणी राष्ट्रवादीला बाजूला सारून शिवसेनेने भाजपशी युती करावी ही आमदार प्रताप सरनाईक यांनी मांडलेली भूमिका अत्यंत योग्य आहे. शिवसेना-भाजपच्या नेत्यांचे एकमेकांशी आजही आपुलकीचे नाते आहे. त्यामुळे पुन्हा भाजपशी युती करण्यास शिवसेनेला अडचण होणार नाही, अशी सरनाईक यांची सूचना योग्य आहे. त्यांच्या सूचनेचा शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री म्हणूनही उद्धव ठाकरे यांनी विचार करावा. त्यांनी या पूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीशी युती करण्याचा घेतलेला निर्णय बदलावा. बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीशी युती करण्याचा निर्णय घेऊ दिला नसता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आपला निर्णय बदलून भाजपशी युती करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

 

 

Exit mobile version