Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सरकार पडेल तेव्हा कळणारही नाही ! : फडणवीस

मुंबई प्रतिनिधी | दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या टिकेला देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युतर देत तुमचे सरकार पडेल तेव्हा कळणारही नसल्याचे सांगत आज जोरदार प्रतिहल्ला केला.

 

कालच्या दसरा मेळाव्यात उध्दव ठाकरे यांच्या टिकेचा मुख्य रोख देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होता. या पार्श्‍वभूमिवर, आज प्रसारमाध्यमांशी बोलतांना फडणवीस यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी भाबडेपणाचा मुखवटा उतरवला पाहिजे. मुख्यमंत्रीपदाची त्यांची महत्त्वकांक्षा होती ती त्यांनी पूर्ण केली. त्याला तत्वज्ञानाची जोड देत आहेत. ते त्यांनी थांबवावं. शिवसेनाप्रमुखांना दिलेला शब्दच पाळायचा होता तर सुभाष देसाई, दिवाकर रावते एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करायचं होतं. मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं तर नारायण राणेंना पक्षातून का बाहेर जावं लागलं? राणेंना तर पक्षप्रमुख व्हायचं नव्हतं. राज ठाकरेंना पक्षातून का जावं लागलं? त्यामुळे दोष देणं थांबवा. आता दोन वर्ष झाले आहेत. किती दिवस तेच तेच बोलणार. राजकारणात महत्त्वकांक्षा असणं गैर नाही. पण त्याला तत्वज्ञानाची जोड देणं कितपत योग्य आहे? असा सवालही त्यांनी केला.

 

फडणवीस पुढे म्हणाले की, मुख्यंमत्री काल म्हणाले की महाराष्ट्राचा बंगाल करायचा आहे. बंगालमध्ये एकही उद्योग टिकत नाही, विरोधात बोलणार्‍यांना ठार मारलं जातं. मग तीच परिस्थिती त्यांना महाराष्ट्रात निर्माण करायची आहे का? जोपर्यंत आमच्या रक्ताचा शेवटचा थेंब आहे तोपर्यंत महाराष्ट्राचा बंगाल कधीही होऊ देणार नाही, महाराष्ट्र हा महाराष्ट्रच राहणार.

 

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कालच्या मेळाव्यामध्ये मुख्यमंत्र्यांची निराशा बाहेर आली. राज्यातल्या काही मंत्र्यांना वसुलीचं सॉफ्टवेअर देण्यात आलं आहे. कोणाकडून किती वसुली करायचं याची नोंद त्यामध्ये ठेवली जाते. पंतप्रधान हे यंत्रणांच्या गैरवापराच्या पूर्णपणे विरोधात आहेत. जर यंत्रणेचा गैरवापर केला असता तर अर्ध मंत्रिमडळ तुरुंगात गेलं असतं. आम्ही लोकशाहीवर विश्वास ठेवणारे लोक आहोत. भ्रष्टाचार खणून काढल्याशिवाय मोदीजी शांत बसणार नाहीत.

 

मुख्यमंत्र्यांनी संघराज्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. काही डाव्या पक्षांना सोबत घेऊन  त्यांनी भारताचे संविधान बदलण्याचा डाव आखल्या असल्याचा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.  उद्धव ठाकरे ज्या सरकारचं नेतृत्व करतात ते राज्याच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार आहे. शेतकर्‍यांना मदत करताना यांच्याकडे पैसे नसतात. काहीतरी कारणं सांगत पाठ दाखवली जाते. यांनी जो भ्रष्टाचार चालवला आहे त्यामुळे ईडी, सीबीआय यांच्या धाडी पडत आहेत. आम्हाला जनतेच्या प्रश्नांमध्ये इंटरेस्ट आहे. सरकार पाडून दाखवा असं आव्हान दिलं जातं. ज्यावेळी सरकार पडणार त्यावेळी यांना समजणारही नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Exit mobile version