सरकारने हिंमत असेल तर किती रुग्णालयांवर कारवाई केली ते जाहीर करावे : फडणवीस

मुंबई (वृत्तसंस्था) आजपर्यंत राज्यातील किती खासगी रुग्णालयातील ८० टक्के बेड सरकारने कधीपासून राखून ठेवले व रुग्णांची लूटमार रोखण्यासाठी काढलेल्या आदेशानुसार किती रुग्णालयांवर कारवाई केली ते सरकारने हिंमत असेल तर जाहीर करावे, असे आव्हान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला दिले आहे.

 

 

राज्यातील खासगी रुग्णालयात करोना रुग्णांकडून वाट्टेल तशी बिलांची आकारणी होत असून खुलेआम सुरु असलेली ही लूटमार रोखण्यात सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. रुग्णांची लूटमार रोखण्यासाठी कागदी घोडे नाचविणाऱ्या आरोग्य विभागाची चौकशी करण्याची मागणी विधान सभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मागील जवळपास पाच महिने खासगी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांकडून लाखांनी उपचाराची बिले वसूल केली जात आहेत. सरकारने ३० एप्रिल रोजी व २१ मे रोजी दोन आदेश जारी केले होते. त्यानुसार करोना रुग्णांवरील उपचारासाठी खासगी रुग्णालयातील ८० टक्के बेड राखून ठेवण्याचा आदेश ३० एप्रिल रोजी जारी झाला तर २१ मे रोजी खासगी रुग्णालयातील लूटमार रोखण्यासाठी नेमके किती दर रुग्णालयांनी आकारावे त्याचा आदेश जारी करण्यात आला. परंतू काही रुग्णालयात तर दिवसाचे उपचाराचे बिल पन्नास हजार ते एक लाख रुपये आकारण्यात येत आहे. प्रामुख्याने मुंबई व ठाणे जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांनी करोनाच्या रुग्णांकडून उपचारासाठी किती रक्कम आकारावी याचे ताळतंत्र सोडल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Protected Content