Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सरकारचे सल्लागार राज्य बुडवायला निघाले आहेत

 

 

नागपूरः वृत्तसंस्था । राज्य सरकारचे सल्लागार कोण हे समजत नाही ते राज्य आणि सरकारलाही बुडवायला निघाले आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. नागपुरात ते पत्रकाराशी बोलत होते.

मेट्रो -३ ची कारशेड आता वांद्रे कुर्ला संकुल येथे बुलेट ट्रेनसाठीच्या प्रस्तावित जागेवर उभारता येते का, या पर्यायाची चाचपणी राज्य सरकारकडून करण्यात येत असल्याची चर्चा आहे. राज्य सरकारच्या या निर्णयवरून देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला धारेवर धरलं आहे.

‘बुलेट ट्रेनचं स्टेशन जमिनीच्या आत करायचं ठरवलं तर त्याचा खर्च किमान पाच ते सहा हजार कोटी रुपये असेल. आता ५०० कोटींमध्ये होणाऱ्या डेपोला जर सहा हजार कोटी लागले तर तो भुर्दंड बसेलच पण त्याचा जो वार्षिक देखरेखीचा खर्च आहे तोदेखील जवळजवळ पाच ते सहा पट अधिक असेल. त्यामुळं हे शक्य नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. शिवाय, कोणीतरी चुकीचे सल्ले देत असून हा पोरखेळ चालला आहे. मुंबईकरांना मेट्रोपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न आहे,’ असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

कांजुरमार्ग येथे मेट्रो कार शेड उभारण्यास उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे व याबाबतची न्यायालयातील सुनावणी दीर्घकाळ चालण्याची शक्यता आहे. त्यामुळे मेट्रोच्या कामावर परिणाम होऊन त्याचा फटका मुंबईकरांना बसू नये यासाठी मेट्रो ३ ची कार शेड वांद्रे कुर्ला संकुलातील बुलेट ट्रेनसाठीच्या प्रस्तावित जागेवर हलविण्याबाबत गांभीर्याने विचार सुरू आहेत.

Exit mobile version