Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

समितीच्या अहवालानंतर मास्क मिळणार ३ ते ४ रुपयांना

 

मुंबई, वृत्तसंस्था । राज्यात मास्क आणि सॅनिटायझर चढया भावाने विक्री होत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मास्क आणि सॅनिटायझरच्या किंमतीवर नियंत्रण आणण्यासाठी समिती नेमली होती. त्या समितीने राज्य सरकारला अहवाल सादर केला आहे. यानुसार एन-95 मास्क त्याच्या प्रकारानुसार साधारण १९ ते ५० रुपयांपर्यंत उपलब्ध होईल. तर दुहेरी आणि तिहेरी पदरांचे मास्क अवघ्या तीन ते चार रुपयांना मिळतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली

या समितीने निर्धारित केलेल्या किंमतीवर निर्णय घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या किंमतींना शासन मान्यता मिळाल्यानंतर सुधारीत दरानुसार मास्क विक्री करणे बंधनकारक असणार आहे. तसेच सर्वसामान्यांना परवडणाऱ्या अशा किफायतशीर किमतीत मास्क उपलब्ध होणार असल्यानं असा निर्णय घेणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे, असेही राजेश टोपे म्हणाले.

कोरोना साथीच्या आधी एन 95 मास्क ४० रुपयांना विकला जायचा. मार्चमध्ये हाच मास्क ४० वरून १७५ रुपये एवढ्या चढ्या दराने विकला गेला. म्हणजे त्यांच्या दरात ४३७.५ टक्के एवढी वाढ झाल्याचे निदर्शनास आले. काही एन 95 मास्कची तर २५० रुपयांपर्यंत विक्री झाली. तर तिहेरी आणि दुहेरी पदर असलेले मास्क ८ ते १० रुपयांवरून १६ रुपयांना विकण्यात आले. त्यांच्या किंमती १६० टक्के पेक्षा जास्त वाढ झाल्याचे समितीच्या निदर्शनास आले आहे.

Exit mobile version