Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

समाजाने महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांची कास धरावी : मुकुंद सपकाळे

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  “बहुजन समाजाने महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांची कास धरावी. संघटित होऊन महात्मा फुल्यांचा कृतिशील वारसा चालवणे आजही काळाची नितांत गरज आहे.” असे आवाहन महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा प्रदेशाध्यक्ष मुकूंद सपकाळे  यांनी केले.

आज शनिवार, दि. २४ सप्टेंबर रोजी सत्यशोधक समाज १५० व्या वर्षात पदार्पण करत आहे . महात्मा फुले यांच्या अतुलनीय ऐतिहासिक कार्याच्या वाटचालीची कृतज्ञ आठवण म्हणून आज डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी ,सत्यशोधकी साहित्य परिषद, भीमरमाई प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव येथील अथर्व पब्लिकेशन्स,श्रीरत्न कॉलनीत आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून मुकुंद सपकाळे मार्गदर्शन करताना बोलत होते.

कार्यक्रमास प्रमुख अतिथी सत्यशोधकी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ. मिलिंद बागुल, प्रा.डॉ.के.के.अहिरे, प्रा. डॉ.सत्यजित साळवे मान्यवर उपस्थित होते. पुढील मार्गदर्शनात सपकाळे म्हणाले की, “सत्तेचे संशोधन करून अनिष्ट रूढी,परंपरा यांच्या गुलामगिरीच्या जोखडात आजही समाज नव्याने जखडला आहे. कार्यकर्त्यांनी जोमाने नव चैतन्याने कार्यप्रवृत्त व्हावे. ” प्रा.डॉ.के.के अहिरे यांनी महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य सांगितले. प्रा.डॉ.सत्यजित साळवे यांनी सत्यशोधक समाजाचे ब्रीद आणि समाज परिवर्तन करताना फुल्यांचा मूल्यात्मिक संघर्ष सांगून बहुजनांसाठी केलेले कार्य सोदाहरण सांगितले. सत्यशोधक समाजाचे तत्व तळागाळापर्यंत पोहोचवून सर्व समाजात सत्यशोधकी विवाह लागले तर फुले यांचे स्वप्न सर्वार्थाने पूर्ण होईल.सत्यशोधकी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ.मिलिंद बागुल आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की, ‘ महात्मा जोतीराव फुले  यांचे विचार देशाला दिपस्तंभासमान असून नव्या पिढीला प्रेरणादायी आहेत. कवयित्री इंदिरा जाधव यांनी महात्मा फुले यांचा वारसा निर्भयपणे चालवणाऱ्या आईच्या हृदय आठवणी सांगितल्या.

भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम पुस्तक भिशीचे संस्थापक जिल्हाप्रमुख विजय लुल्हे यांनी महात्मा फुले स्थापित सत्यशोधक समाजाच्या दीडशे वर्षाच्या पदार्पणानिमित्त अथर्व प्रकाशनास महात्मा फुले यांचा सुबक अर्ध पुतळा सादर भेट म्हणून संगीता माळी यांच्याकडे सुपूर्द केला. कार्यक्रमास कुमुद प्रकाशनाच्या संचालिका, संगीता माळी, कुमूद माळी, आकाश सपकाळे, सुनील माळी, गिरीश कुलकर्णी, वेध माळी, सुनील पाटील, महेंद केदार, विजय करींदीकर, शरद महाजन यांसह रसिक उपस्थित होते.

पुस्तक भिशीचे जिल्हाप्रमुख विजय लुल्हे यांनी प्रस्तावनेत सत्यशोधक समाजाचे उद्दिष्टे सांगून सूत्रसंचालनात  पुरोगामी समाजाच्या मन्वंतरासाठी महात्मा फुले यांच्या कार्यातील ऐतिहासिक घटना सांगितल्या.आभार प्रदर्शन बापू शिरसाठ यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुस्तक  भिशी सभासद चित्रकार सुनील दाभाडे, ह.भ.प.मनोहर खोंडे, बापू पानपाटील ,महेश शिंपी यांनी अमूल्य सहकार्य केले.

Exit mobile version