Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

समाजवाद , साम्यवादाचा प्रभाव रोखण्यासाठी मोदी – ट्रम्प मैत्री महत्वाची

वॉशिंग्टन: वृत्तसंस्था । डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून प्रचारात पंतप्रधान मोदी यांच्या व्हिडिओचा वापर करण्यात येत आहे. जगभरात समाजवाद, साम्यवादाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी या दोन नेत्यांची मैत्री कामी ठरेल असे डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलाने म्हटले आहे .

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी जवळपास दोन आठवड्यांचा कालावधी शिल्लक असताना जोरदार प्रचार सुरू झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे पुत्र डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. माझे वडील डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात घनिष्ठ मैत्री असल्याचे त्यांनी म्हटले.

डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर यांनी सांगितले की, ट्रम्प आणि मोदी यांच्यातील मैत्री ही सर्वाधिक शक्तीशाली आहे. यामुळे दोन्ही देशांना मोठा फायदा होणार आहे. या दोन नेत्यांच्या नेतृत्वात अमेरिका आणि भारत हे लोकशाहीवादी देश जगभरात फैलावत असलेल्या समाजवाद आणि साम्यवादाविरोधात लढत असल्याचे त्यांनी सांगितले. डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर यांनी डेमोक्रेटीक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांच्यावरही निशाणा साधला. बायडन निवडून आल्यास भारतासाठी ही चांगली बाब राहणार नाही. बायडन चीनविरोधात मवाळ भूमिका घेतील असेही ज्युनिअर ट्रम्प यांनी म्हटले.

ज्युनिअर ट्रम्प यांच्याकडे डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचाराची धुरा आहे. अमेरिकन-भारतीय समुदायासोबत त्यांचे चांगले संबंध आहेत. ट्रम्प यांच्या प्रचारार्थ ‘फोर मोर इअर्स’ असे शीषर्क असलेला १०७ सेकंदाचा व्हिडिओ जारी करण्यात आला आहे. या व्हिडिओची सुरूवात ट्रम्प आणि मोदी यांच्या फूटेजने होते.

 

अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारतीय वंशांच्या अमेरिकन मतदारांची भूमिका निर्णयाक ठरणार आहे . जवळपास २० लाख मतदार आहेत. बहुसंख्याक भारतीय वंशाचे मतदार हे डेमोक्रॅटीक पक्षाला मतदान करतात. मात्र, या निवडणुकीत डेमोक्रेटीक पक्षाच्या मतपेढीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न ट्रम्प यांच्याकडून सुरू आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकेतील भाषणाचाही वापर केला जात आहे. अमेरिकेत ३ नोव्हेंबर रोजी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक पार पडणार आहे.

Exit mobile version