Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

समाजवादी पार्टी छोट्या पक्षांसोबत आघाडी करणार

 

प्रयागराज : वृत्तसंस्था । ”समाजवादी पार्टी छोट्या पक्षांसोबत आघाडी करेल.  भाजपा खऱ्या मुद्द्यांपासून पळ काढत आहे, बेरोजगारी, महागाईच्या विषयावर बोलत नाही.  उत्तर प्रदेशच्या लोकांना बदल हवा आहे असे समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनीं म्हटले आहे .

 

उत्तर प्रदेशमध्ये आगामी काळात विधानसभा निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर आता सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. तर, नेते मंडळींच्या विधानांमुळे राजकीय वातावरण गरम होताना दिसत आहे. आज समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचं एक मोठं विधान समोर आलं आहे. याशिवाय, अखिलेश यादव यांनी भाजपावर देखील टीका देखील केली आहे.

 

लोक बदलासाठी मतदान करतील. उत्तर प्रदेशमध्ये जेव्हापासून भाजपाचे सरकार आले आहे, तेव्हापासून त्यांना संकल्प पत्राचा विसर पडला आहे. मला वाटतं भाजपाने त्यांचं संकल्पपत्र कचऱ्यात टाकलं आहे.” असं अखिलेश यादव म्हणाले आहेत.

 

 

अशातच झालेल्या पंचातय निवडणुकीत भाजपाने निकालावर परिणाम होईल, असा प्रयत्न केला. मात्र तरी देखील त्यांचा पराभव झाला. पैसा व प्रशासनाच्या बळावर भाजपा निवडणुका हाताळत आहे. असा आरोप देखील अखिलेश यादव यांनी केला आहे.

 

 

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेस पक्षाने तिसऱ्यांदा सत्ता मिळवली आहे. या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने ‘खेलो होबे’ची घोषणा दिली होती. या घोषणेमुळे पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं होतं. तृणमुल काँग्रेस विरुद्ध भाजपा असा सामना पाहायला मिळाला होता. मात्र तृणमूल काँग्रेसने भाजपाला चितपट करत विधानसभेत बहुमत मिळवलं. आता तोच कित्ता समाजवादी पार्टीने उत्तर प्रदेशात गिरवण्याचं मानस केला आहे. ‘खेलो होबे’च्या घोषणेवरून उत्तर प्रदेशात ठिकठिकाणी ‘खेला होई’ या घोषणेची फलकबाजी करण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीने ही घोषणा दिली आहे. ‘खेला होबे’चं हे ‘खेला होई’ हे भोजपुरी व्हर्जन आहे.

 

Exit mobile version