Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

समरसता महाकुंभातील आकर्षण म्हणजे ‘महामंडलेश्वर पट्टाभिषेक’ दशाब्दी महोत्सव

फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट व अखिल भारतीय सनातन सतपंथ परिवार यांच्यातर्फे २९ ते ३१ डिसेंबर २०२२ दरम्यान वढोदे फैजपूर येथील निष्कलंक धाम येथे आयोजित समरसता महाकुंभात सतपंथ मंदिराचे गादीपती श्री जनार्दन हरीजी महाराज यांचा महामंडलेश्वर पट्टाभिषेक दशाब्दी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

२०१३ मध्ये आयोजित महाकुंभमेळ्यात श्री जनार्दन हरीजी महाराज यांना जगद्गुरू व शंकराचार्य यांच्या उपस्थितीत महामंडलेश्वर ही उपाधी प्रदान करण्यात आली होती. या सोहळ्यास दहा वर्ष पूर्ण झाली असल्याने महामंडलेश्वर पट्टाभिषेक महोत्सव साजरा करण्याचे नियोजन समरसता महाकुंभात करण्यात आले आहे. अध्यात्माचे शिखर म्हणजे आचार्य महामंडलेश्वर. मंडलेश्वर याचा अर्थ मंडलाचा ईश्वर अथवा अध्यक्ष संन्यासींना दीक्षा देण्यात आचार्य महामंडलेश्वर यांची प्रमुख भूमिका असते. प्रत्येक कुंभमेळ्याच्या प्रारंभी संत समाज एक सभा घेवून निर्णय घेतात की, महामंडलेश्वर ही उपाधी कोणाला प्रदान करायची. महामंडलेश्वर ही उपाधी मिळण्यासाठी विशेष योग्यता असणे गरजेचे असते. आचार्यत्वाचे ज्ञान, संपूर्ण संप्रदायाचे नेतृत्व करण्याची क्षमता, संस्कृत, वेद, पुराण यांची माहिती, वैराग्य धारण केलेला संन्यासी, घर-परिवार व पारिवारिक संबंध नसावे, वयाचे कोणतेही बंधन नाही, जीवनाच्या चौथ्या टप्प्यात म्हणजे वानप्रस्थाश्रमात महामंडलेश्वर बनता येते आणि सर्वात महत्वाचे, कुंभमेळ्यातील आखाड्यांमध्ये परीक्षा घेतली जावून उत्तीर्ण झाल्यास महामंडलेश्वर उपाधी अत्यंत मानाने, सन्मानाने मोठ्या समारंभात प्रदान केली जाते. परमपूज्य स्वामी जनार्दन हरीजी महाराज यांना 2013 मध्ये आयोजित महाकुंभमेळ्यात महामंडलेश्वर ही उपाधी मोठ्या सन्मानाने समारंभपूर्वक प्रदान करण्यात आली आहे. या सोहळ्यास दहा वर्षे पूर्ण झाली असल्याने श्री जनार्दन हरीजी महाराज यांचा महामंडलेश्वर पट्टाभिषेक दशाब्दी महोत्सव समरसता महाकुंभात साजरा करण्यात येणार आहे.

Exit mobile version