Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सप्टेंबर महिन्यात मुंबईत २६ वर्षांतील विक्रमी पाऊस

मुंबईः वृत्तसंस्था । मुंबई व उपनगरात काल संध्याकाळपासूनच जोर धरल्यानं अनेक सखल भागात पाणी साचले असून मुंबईकरांची दाणादाण उडाली आहे. मंगळवारपासून मुंबईत तब्बल २८६.४ मिमि पावसाची नोंद झाली आहे. या पावसाची गणना अतिवृष्टीमध्ये केली जाते. मुंबईच्या पावसाने केलेल्या फटकेबाजीने नवा विक्रम रचला आहे.

सप्टेंबर महिन्यात कोसळलेल्या पावसानं गेल्या अडीच दशकांमध्ये पहिल्यांदाच फक्त २४ तासांत मुंबईत सर्वाधिक पाऊस कोसळला आहे. या पावसानं २६ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला आहे. १९९४ ते २०२० या कालावधीत सप्टेंबर महिन्यात दुसऱ्यांदा एका दिवसात मुंबईत इतका पाऊस पडला. त्याचबरोबर, १९७४- २०२० दरम्यान सप्टेंबर महिन्यात २४ तासांत सर्वाधिक पाऊस पडण्याची ही चौथी वेळ आहे.

मंगळवारी सकाळी ८.३० ते बुधवारी ५. ३०पर्यंत मुंबईत २८६.४ मिमि पावसाची नोंद झाली आहे. याच दरम्यान, दक्षिण मुंबईत म्हणजेच कुलाब्यात १४७.८ मिमि पाऊस पडला. तर, मंगळवारी संध्याकाळी ५.३० ते ११.३० या सहा तासांच्या कालावधीत मुंबईत १०७ मिमि पावसाची नोंद झाली आहे. तर, रात्री ११.३० ते ५.३० या सहा तासांमध्ये दक्षिण मुंबईत ८९ मिमि पावसाची नोंद झाली आहे.

मंगळवारी सायंकाळनंतर तीन तास सर्वत्र पाऊस झाल्यानं सखल भागात पाणी भरले आहे, रस्ते जलमय झाले आहे. मध्य रेल्वे मार्गावरील सायन स्टेशन येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून रेल्वेरूळ पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. सायनजवळ लोकल खोळंबल्याने अनेक प्रवाशांची कोंडी झाली

आजही रात्रभर पावसाचा जोर कायम राहणार असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र सप्टेंबर महिना संपायला काहीच दिवस शिल्लक आहेत. अजून परतीच्या पावसालाही सुरुवात झालेली नाही. त्यामुळे मुंबईमध्ये अजूनही पाऊस कोसळेल का, अशी चिंता व्यक्त होत आहे.

Exit mobile version