Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सप्टेंबरपासून सिरम इन्स्टिट्युट स्पुटनिक लसीचंही उत्पादन करणार

 

पुणे : वृत्तसंस्था । रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीचे उत्पादक आणि भारतातील सिरम इन्स्टिट्युट यांनी येत्या सप्टेंबरपासून सिरममध्येच स्पुटनिक व्ही लसीचं उत्पादन सुरू करण्याची घोषणा केली आहे.

 

गेल्या महिन्याभरापासून भारतात व्यापक प्रमाणावर लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. केंद्र सरकारने १८ वर्षांवरील नागरिकांना देखील लसीकरण करण्यासंदर्भात घोषणा केल्यानंतर त्याची अंमलबजावणी देखील सुरू झाली. मात्र, त्यामुळे लसींचा पुरवठा अपुरा पडू लागला. भारतात सध्या कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन यासोबतच स्पुटनिक व्ही आणि मॉडर्ना या लसींना देखील मंजुरी देण्यात आली असून लवकरच त्यांचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा होण्याची शक्यता आहे.    कोरोनाविरोधातील लढ्यामध्ये भारताकडे अजून एका लसीचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा सुरू होऊ शकणार आहे.

 

 

 

 

भारतात वर्षाला स्पुटनिक व्ही लसीचे ३० कोटी डोस तयार करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. यासंदर्भात रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडचे सीईओ कायरिल दिमित्रिएव्ह यानी माहिती दिली आहे. “सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया सप्टेंबरमध्ये स्पुटनिक व्हीच्या उत्पादनाला सुरुवात करणार आहे. काही इतर भारतीय उत्पादक देखील उत्पादनासाठी तयार आहेत”, असं ते म्हणाले.

 

 

यासंदर्भात कंपनीकडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकामध्ये सविस्तर माहिती देण्यात आली आहे. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड आणि सिरम इन्स्टिट्युट यांनी संयुक्तपणे घेतलेल्या निर्णयानुसार भारतात वर्षाला ३० कोटी स्पुटनिक व्ही लसीचे डोस उत्पादित करण्याचा मानस आहे. यापैकी लसीच्या डोसचा पहिली हफ्ता येत्या सप्टेंबर महिन्यात येईल. यासाठी सिरम इन्स्टिट्युटला याआधीच लसीसाठीच्या सेल्स आणि व्हेक्टर सॅम्पल्स मिळाले असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे. आत्तापर्यंत स्पुटनिक व्ही लसीटी जगातल्या ६७ देशांमध्ये नोंदणी करण्यात आली आहे. जगातली ३५० कोटी लोकसंख्या या देशांमध्ये राहाते, असं देखील या परिपत्रकात नमूद करण्यात आलं आहे.

 

 

Exit mobile version