सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात डॉक्टरला अटक

 

  सांगली : वृत्तसंस्था ।  मिरज शहरात   दुसऱ्या लाटेत  रुग्णांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अ‍ॅपेक्स हॉस्पिटलच्या प्रमुख डॉक्टराला अटक करण्यात आली आहे.

 

त्याच्यावर महात्मा गांधी पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

 

अ‍ॅपेक्स केअर हॉस्पिटल चालवणारे ३६ वर्षीय डॉ. महेश जाधव यांना कोर्टाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. कोविड रूग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक रूग्णालयात पुरेशी डॉक्टर, उपकरणे व इतर सोयीसुविधा नसल्याची माहिती तपासणीनंतर समोर आली आहे.

 

१४ एप्रिलला एमबीबीएस, एमएस (प्लॅस्टिक सर्जन) आणि एमसीएचची पदवी असल्याचे सांगणाऱ्या डॉ. महेश जाधवला स्थानिक पालिका आयुक्तांनी कोविड रुग्णांवर उपचार करण्यास परवानगी दिली होती. मात्र, २१ मे रोजी तक्रारी आल्यानंतर आरोग्य अधिकारी डॉ. सुनील आंबोळे यांच्या नेतृत्वात पालिका आरोग्य अधिकाऱ्यांच्या पथकाने तपासणी केली असता रूग्णांना उपचार न देता रुग्णांकडून जास्त शुल्क आकारले जात असल्याचे समजले.

 

वैद्यकीय शिक्षण संचालनालय आणि आरोग्य सेवा संचालनालयाने ठरवलेल्या अटी व मार्गदर्शक तत्त्वे रुग्णालयातर्फे अमलात आणली जात नसल्याचे अंबोले यांना आढळले. २७ मे रोजी अंबोले यांनी स्थानिक पोलिसांकडे तक्रार दाखल केली. २९ मे रोजी पोलिसांनी पंचनामा केला असता त्यांना आढळले की रुग्णालयात तीन डॉक्टर नेमलेले आहेत पण त्यापैकी कोणीही पूर्णवेळ कर्तव्यावर नव्हते.

 

“४३ दिवसांत २०७ रुग्ण दाखल झाले आणि त्यापैकी ८७ मरण पावले. रुग्णालयात उपचारासाठी डिफ्रिब्रिलेटर, एक्सरे, सक्शन मशीन किंवा ईसीजी मशीन सारखी मूलभूत उपकरणे नव्हती. तेथे फक्त एक व्हेंटिलेटर आणि १० बीआयपीएपी मशीन्स होती. आम्ही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे, ”अशी माहिती पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी दिली.

 

“गेल्या वर्षी होमिओपॅथिक विद्यार्थी येथे निवासी वैद्यकीय अधिकारी (आरएमओ) म्हणून काम करीत होते आणि डॉक्टर जाधव यांना फोनवरून सूचना देऊन कोविड रूग्णांवर उपचार करीत होते. एका रुग्णाच्या मृत्यूनंतर ते मृत्यूच्या चिठ्ठी देखील लिहित होते, ”असे अन्य एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

Protected Content