Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सत्तार यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी अन्यथा… – महेश तपासे 

मुंबई – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणार्‍या मंत्री अब्दुल सत्तार यांची २४ तासाच्या आत मंत्रीमंडळातून हकालपट्टी करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या पत्रातून दिला आहे.

विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्षामध्ये महाराष्ट्र राज्याच्या राजकीय संस्कृतीचा एक धागा गेली अनेक वर्षे जपण्यात आलेला आहे. यामध्ये विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्ष यांनी गेली अनेक वर्षे राजकारणापलीकडे जाऊन सौहार्दाचे वातावरण जपले आहे. अशामध्ये आपल्या मंत्रीमंडळातील मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याविषयी केलेले वक्तव्य अत्यंत अशोभनीय व असंस्कृत आहे. याचा तीव्र निषेध महेश तपासे यांनी केला आहे.

खासदार सुप्रियाताई सुळे यांचा अपमान म्हणजे राज्यातील तमाम महिलांचा अपमान आहे त्यामुळे तात्काळ अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी करावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा निर्वाणीचा इशारा महेश तपासे यांनी दिला आहे.

Exit mobile version