Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सतेज पाटील यांची विधानपरिषदवर बिनविरोध निवड

कोल्हापूर | कॉंग्रेसचे मंत्री सतेज पाटील यांच्या विरोधातील भाजपचे उमेदवार आणि डमी उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे त्यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड निश्‍चीत झाली आहे.

 

दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला.  या बैठकीनंतर कोल्हापूर विधान परिषदेतील भाजपचे उमेदवार अमल महाडिक व डमी उमेदवार शौमिका महाडिक यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची सूचना भाजपच्या कमांडकडून करण्यात आली. परिणामी कॉंग्रेसचे उमेदवार व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोल्हापूर विधान परिषद निवडणुकीत बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला.

दरम्यान, भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठांकडून महाडिक यांना विधान परिषद निवडणुकीतून माघार घेण्याची सूचना आल्यानंतर महाडिक कुटुंबीय आणि समर्थकांची बैठक झाली. या बैठकीत महाडिक यांनी पक्षाचा आदेश मानत माघार घेण्याचा निर्णय घेतला. कोल्हापुरात पालकमंत्री सतेज पाटील व माजी आमदार अमल महाडिक या पारंपारीक कट्टर विरोधकांत इर्षेची लढाई सुरू होती. यातच आता पुन्हा सतेज पाटील व अमल महाडीक विधान परिषद निवडणुकीत आमने-सामने आले होते.  परंतू निवडणूक बिनविरोधचा निर्णय झाल्याने कोल्हापूरची जागा कॉंग्रेसला सोडण्याचा निर्णय भाजपने घेतला. बिनविरोधची समझोता एक्स्प्रेस यशस्वी झाल्याने सतेज पाटील यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले आहे.

Exit mobile version