Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सततच्या विद्युत पुरवठा खंडीतमुळे भुसावळकर त्रस्त…!

भुसावळ प्रतिनिधी । सतत होणाऱ्या वीजपुरवठा खंडीतमुळे भुसावळ शहरातील यावल – रावेर रस्त्यावरील सेंट अलायसेस स्कुल, गिरीजा हॉस्पिटल परिसर, शांतीनगर परिसरातील लोक कमालीचे त्रस्त झालेले असून याकडे महावितरण कंपनी आणि लोकप्रतिनिधी यांनी गांभीर्याने लक्ष घालण्याची मागणी केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या पाच-सहा दिवसांपासून या रहिवासी भागात दिवस व रात्रभरातून सहा ते सात वेळा विद्युत पुरवठा खंडित होत आहे. या परिसरात बरेच हॉस्पिटल सुद्धा आहे. तसेच लोकांची मोठी गैरसोय होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. रहिवासी ज्या वेळेस महावितरण कार्यालयाशी संपर्क साधतात तेव्हा, ‘फक्त दहा मिनिटांनी विद्युत पुरवठा सुरळीत होईल, झाडांच्या फांद्या कापल्या जात आहेत, किमान चार तास तरी लागेल तर कधी’ टेक्निकल प्रॉब्लेम आहे’. असे उडवाउडवीची उत्तरे दिली जातात अशी या परिसरातील नागरिकांची तक्रार आहे. विशेष म्हणजे या परिसरात जास्त झाडेही नाहीत, की कोणत्याही फांद्या तोडल्या गेलेल्या नाहीत. कोणाच्या तरी सांगण्यानुसार लोकांना त्रासाला सामोरे जावे म्हणून हेतुपुरस्सर विद्युत पुरवठा खंडित करण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोपही संतप्त नागरिकांनी “लाईव्ह ट्रेंड्स न्यूज”च्या प्रतिनिधीशी बोलताना केला आहे. सध्या १० ते ५ या वेळेत मुलांना ऑनलाईन पाठ शिकवले जात असतात, मुले अभ्यास करत असतात, तो सुद्धा होऊ शकत नाही. काही विभागात पुरवठा अतिशय सुरळीत, तर काही विभागात नाही असा दुजाभाव केला जात आहे. जर विद्युत पुरवठा करण्यात आला तर होलटेज डीम असते असेही त्यांनी सांगितले आहे. लवकरच महावितरण कंपनीने तसेच वार्डाच्या नगरसेवकाने या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष घालावे व लोकांना सहकार्य करावे अशी आग्रही मागणी होत आहे.

Exit mobile version