Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सचिन वाझे वर्षावर जाऊन कसे राहायचे? ; नितेश राणे यांचा सवाल

 

मुंबई : वृत्तसंस्था ।  “सचिन वाझे वर्षावर जाऊन कसे राहायचे? त्यांना कुणी परवानगी दिली?” असा सवाल  नितेश राणेंनी केला आहे

 

सचिन वाझे प्रकरणात एनआयए चौकशी करत असताना भाजपाकडून आमदार नितेश राणे यांनी गंभीर आरोप केला आहे. “सचिन वाझे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा माणूस आहे. त्यांनाच रिपोर्टिंग व्हायचं. परमबीर सिंग यांना ते विचारतच नव्हते”, असं नितेश राणे म्हणाले आहेत. एका  वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे आरोप केले . अँटिलियाबाहेर सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्या प्रकरणी एनआयए चौकशी करत असून सचिन वाझे हे सध्या एनआयएच्याच कोठडीत आहेत.

 

नितेश राणेंनी सचिन वाझे प्रकरणावरून थेट शिवसेना कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत. “सचिन वाझे थेट उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना रिपोर्टिंग करायचे. परमबीर सिंह यांना ते विचारायचे नाहीत. ते आदित्य ठाकरेंसोबत ऑनकॉल होते. म्हणूनच त्यांना वाचवायचे प्रयत्न होत होते”, असं राणे म्हणाले आहेत.

 

“सचिन वाझे वर्षावर का राहायचे? वर्षा कुणाचं निवासस्थान आहे? वर्षावर राहायची परवानगी त्यांना कुणी दिली होती? त्यामुळेच सचिन वाझे हा थेट उद्धव ठाकरे यांचा माणूस आहे”, असं नितेश राणे म्हणाले आहेत.

 

नितेश राणेंनी राज्यात वाढत असलेल्या कोरोनाच्या आकड्यांवर देखील संशय व्यक्त केला. “जेव्हा जेव्हा हे सरकार अडचणीत आलंय, तेव्हा तेव्हा कोरोनाचे आकडे वाढले आहेत. सचिन वाझेंचं प्रकरण समोर आलं की लगेच दणादण  आकडे वाढायला लागले. फक्त महाराष्ट्रात वाढत आहेत. देशात वाढत नाहीयेत. त्यामुळे याची चौकशी व्हायला हवी. खरंच  आकडे वाढत आहेत की स्वत:च्या चुका लपवण्यासाठी या बातम्या घडवल्या जात आहेत आणि लॉकडाऊनच्या धमक्या दिल्या जात आहेत याची चौकशी केली पाहिजे”, असं नितेश राणे म्हणाले आहेत.

Exit mobile version