Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सचिन वाझे पोलीस सेवेतून बडतर्फ

 

मुंबई : वृत्तसंस्था । मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं सापडल्यामुळे चर्चेत आलेल्या सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन वाझे यांना आता पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना अटक करण्यात आली होती.

 

एनआयएकडून हा तपास सुरु होता. २५ फेब्रुवारीला उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पियो कार आढळून आली होती.तर या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह यानंतर काही दिवसांनी म्हणजेच ५ मार्च रोजी कळव्यातल्या खाडीमध्ये सापडला होता. आधी तपास दहशतवादविरोधी पथक करत होतं. मात्र, त्यानंतर कोर्टाच्या आदेशानुसार, हा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात आला.

 

या दोन्ही गुन्ह्यातील आरोपांवरुन वाझे यांना एनआयएकडून अटक कऱण्यात आली होती. त्यानंतर त्यांना निलंबितही करण्यात आलं होतं. वाझे यांनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयातही धाव घेतली होती. मात्र, त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला.

 

अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी बेवारस सोडण्यात वाझे यांचा सहभाग स्पष्ट झाल्याचा दावा एनआयएकडून करण्यात आलेला असून ‘‘हे कृत्य वाझे यांनी कबूल केले आहे. मात्र अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटके ठेवणे, अंबानी कुटुंबाला धमकावण्याचा कट त्यांनी एकट्याने रचलेला नाही. या कटात अन्य व्यक्तीही सहभागी असाव्यात’’, असा संशय असल्याचे एनआयएकडून सांगण्यात आलं होतं.

Exit mobile version