Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सचिन वाझेंच्या आरोपांवर अनिल परब यांनी मांडली भूमिका

 

मुंबई : वृत्तसंस्था ।   सचिन वाझे  यांच्या आरोपाला अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलं  “जे बाळासाहेब ठाकरे माझं दैवत आहेत त्यांची आणि माझ्या दोन मुलींची शपथ घेऊन सांगतो, की सचिन वाझेंनी केलेले आरोप खोटे आहेत. मला बदनाम करण्यासाठीच आहेत”, असं ते  म्हणाले

 

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बनंतर आता  सचिन वाझे यांच्या लेटर बॉम्बची चर्चा सुरू झाली आहे. सचिन वाझे यांनी एनआयएला लिहिलेल्या पत्रामध्ये त्यांनी अनिल देशमुख यांच्याप्रमाणेच अनिल परब यांच्यावर देखील खंडणी वसूल करण्याची मागणी केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.

 

यावेळी अनिल परब यांनी आपण कोणत्याही चौकशीला तयार असल्याचं सांगितलं. “सचिन वाझेंचे आरोप आहेत की जून आणि जानेवारीमध्ये मी त्यांना सांगितलं होतं. मग इतक्या दिवसांमध्ये त्यांनी यावर काहीही सांगितलं नाही. परमबीर सिंग यांच्याही पत्रामध्ये याचा कुठेही उल्लेख नाही. पण मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या माणसाला बदनाम करणं गरजेचं आहे हा एका धोरणाचा भाग आहे. सरकारला बदनाम करण्याच्या धोरणाचा हा एक भाग आहे. त्यामुळे एनआयए, सीबीआय, रॉ, नार्टोटिक्स अशा कोणत्याही चौकशीला सामोरा जायची माझी तयारी आहे”, असं परब  म्हणाले.

 

“सचिन वाझेंनी पहिला आरोप केलाय की एसबीयुटी प्रकल्पाच्या ट्रस्टींकडून मी ५० लाख रुपये मागितले. त्यांनी दुसरा आरोप केलाय की जानेवारी २०२१ला मी मुंबई पालिकेच्या कंत्राटदारांकडून प्रत्येकी २ कोटी रुपये जमा करण्याच्या सूचना त्यांना दिल्या. या दोन्ही गोष्टी धादांत खोट्या आहेत. मी त्या नाकारतोय. मी सच्चा शिवसैनिक आहे. माझ्यावर खंडणीचे कोणतेही संस्कार नाहीत”, असं ते म्हणाले.

Exit mobile version