Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सक्तीच्या वीज बिलवसुली विरोधात १९ मार्चला राज्यभर सर्वपक्षीय आंदोलन , राजू शेट्टींची घोषणा

 

कोल्हापूर : वृत्तसंस्था । सक्तीच्या वीज बिलवसुली विरोधात 19 मार्च रोजी राज्यभर सर्वपक्षीय आंदोलन करणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी  यांनी केली आहे.

 

सरकारकडून अचानक सक्ती केली जातेय. सर्वसामान्यांनी पैसे कुठून आणायचे?, असा सवाल त्यांनी  केलाय.

 

कोल्हापुरात सक्तीच्या वीज वसुली विरोधात सर्वपक्षीय बैठक पार पडली. बैठकीत आंदोलनाची दिशा स्पष्ट झाली आहे. सक्तीच्या वीज बिल वसुलीच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

 

 

राज्य सरकार अशी अचानक सक्ती करुच कसं शकतं?, असं म्हणत दोन मंत्र्यांच्या भांडणात सर्वसामान्य जनतेचा जीव जातोय. अशी अचानक सक्ती केली जातेय तर पैसे आणायचे कुठून? त्यामुळे ग्राहकांना वीज बिल भरायला एक महिन्याचा वेळ द्यायला हवा, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे.

 

लॉकडाऊन काळातील वीज बिल सरकारने माफ करावे ही मागणी आमची आजही ठाम आहे. 19 मार्चला महाराष्ट्रात पाहिल्यांदा शेतकऱ्यांची आत्महत्या झाली होती. त्यामुळे त्याच दिवशी राज्यभर आंदोलन केले जाणार आहे, असंही राजू शेट्टी यांनी सांगितलं

 

19 मार्चच्या आंदोलनात सर्वसामान्य जनतेचा रोष दिसेल. सर्वसामान्यांमध्ये बीजबिलावरुन सरकारवर नाराजी आहे. सरकारने ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी, असंही राजू शेट्टी म्हणाले.

 

शेतकऱ्यांचे तीन महिन्यांचे वीजबिल माफ करावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी  यांनी केली. वीजबिल माफीशिवाय आम्ही माघार घेणार नाही. एकाही शेतकऱ्याचे वीज कनेक्शन तोडू देणार नाही, असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला होता.

 

लॉकडाऊन काळातील तीन महिन्यांचं घरगुती वीजबिल माफ करावं, अशी भूमिका घेऊन जून महिन्यापासून आम्ही सातत्याने आंदोलन करत आहोत. शहरी असो किंवा ग्रामीण असो, महाराष्ट्रातील 1 कोटी 35 लाख कुटुंबांना लाभ मिळू शकतो. ही माफी घेतल्याशिवाय गप्प बसायचं नाही, ही आमची भूमिका आहे, असंही राजू शेट्टी यांनी सांगितलं होतं. आजही ते या मागणीवर ठाम असल्याचं त्यांनी सांगितलं.

Exit mobile version