Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सकल मराठा समाजा च्या वतीने राज्यपाल कोश्यारी तसेच सुधांशु त्रिवेदी यांचा जाहिर निषेध

खामगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | सकल मराठा समाज खामगावच्या वतीने छत्रपती शिवरायांचा तसेच थोर महापुरुषांचा अवमान करणार्‍या राज्यपाल भगतसिंग  कोश्यारी तसेच भाजपा प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांचा जाहिर निषेध करीत या दोघांवर कठोर कारवाई करणे करीता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उपविभागीय अधिकारी खामगाव यांचे मार्फत निवेदन सादर करण्यात आले.

 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, महाराष्ट्रातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी संपूर्ण विश्वाचे अखंड हिंदुस्तानाचे व महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांचा अवमान करणारे वक्तव्य केले आहे. सदर राज्यपाल कोशियारी यांनी या आगोदर राजमाता माँ जिजाऊ, छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिबा फुले, भारतीय महिला शिक्षणाचा पाया रचणार्‍या आद्य समाजसेविका सावित्रीबाई फुले यांच्या संदर्भात सुद्धा अवमान जनक वक्तव्य केले होते. ही व्यक्ती ज्या संविधानिक महत्वाच्या पदावर विराजमान आहे त्या पदाचा सन्मान न ठेवता समाज भावनांचा आदर न करता थोर पुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करीत आहे. त्यांच्या वक्तव्याने समाज भावना दुखावल्या जात आहेत अशी बेशिस्त वागणारी व्यक्ती ही अश्या महत्वाच्या पदावर विराजमान करण्याच्या लायकीची नाही म्हणुन राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी तमाम शिवप्रेमींची जाहीर माफी मागावी व आपल्या राज्यपाल पदाचा राजीनामा स्वतःहून द्यावा जर ते निर्लज्जपणे या राज्यपाल पदाचा राजीनामा देत नसतील तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बेशिस्त माणसाला राज्यपाल पदा वरुन निष्काशीत करावे ही विनंती व भाजपा प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी सुध्दा छत्रपती शिवरायांबद्दल अवमानजनक उद‍्गार काढले आहेत म्हणून या थोर महापुरुषांचा अवमान करणार्‍या दोन्हीही व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी ही विनंती. जर या प्रकरणासंदर्भात समाधानकारक कार्यवाही न झाल्यास सकल मराठा समाज बांधव खामगाव च्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल या आंदोलनातून जर कोणताही अनुचित प्रकार घडल्यास याला सर्वस्वी भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी व राज्यपाल भगतसिंग कोशीयारी हे जबाबदार राहतील.असे सकल मराठा समाजाच्या वतीने व खामगाव शहर व ग्रामीण परिसरातील शिवप्रेमींच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे.

यावेळी निवेदन देतांना सकल मराठा समाजाचे व विविध मराठा समाज संघटनेचे पदाधिकारी व मातृशक्‍ती तसेच शिवप्रेमी समाज बांधव मोठया प्रमाणात उपस्थित होते.

Exit mobile version