Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

संसदेत केंद्र सरकारविरोधात आंदोलन

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । पेगॅसस हेरगिरीबद्दल सरकार विरोधकांच्या निशाण्यावर आहे. फोन टॅप केल्याच्या आरोपाखाली काँग्रेस व अन्य विरोधी पक्ष संसदेत केंद्र सरकारविरोधात आंदोलन करत आहेत.

दरम्यान, हॅकिंग प्रकरणातील अहवालात आणखी काही नावे समोर आली आहेत. उद्योगपती अनिल अंबानी यांचा फोनही हॅक झाल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय सीबीआयचे माजी संचालक आलोक वर्मा यांचा फोनही हॅक केल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या यादीमध्ये इतर नावे देखील आहेत.

पेगॅसस प्रकल्प गटाच्या माध्यम भागीदारांनी विश्लेषण केलेल्या नोव्हेंबरच्या यादीमध्ये अनिल अंबानी आणि रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी समूहाचे (एडीएजी) आणखी वापरले जाणारे फोन नंबर टाकण्यात आले आहेत.  अनिल अंबानी सध्या तो फोन नंबर वापरत आहेत की नाही याची खातरजमा करण्यात आलेली नाही. याबद्दल सध्या कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही  

 

अहवालानुसार, २०१८मध्ये अंबानी आणि त्यांच्या कर्मचार्‍यांचा फोन नंबर यादीमध्ये टाकण्यात आला होता, जेव्हा सर्वोच्च न्यायालयात राफेल जेट खरेदी करण्याबाबत भारत सरकारच्या दसॉल्त एव्हिएशनबरोबरच्या कराराबाबत कायदेशीर आव्हान उभे राहिले होते.   “दसॉल्त एव्हिएशनचे भारतातील प्रतिनिधी वेंकट राव पोसिना, साब इंडियाचे माजी प्रमुख इंद्रजित स्याल आणि बोइंग इंडियाचे प्रत्यूष कुमार हे सर्व २०१८ आणि २०१९ मध्ये वेगवेगळ्या वेळी लीक झालेल्या माहितीमध्ये दिसले आहेत”

 

सीबीआयचे संचालक वर्मा यांचा फोन नंबर ऑक्टोबर २०१८ मध्ये पेगॅससच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आला होता. जेव्हा सीबीआय अधिकाऱ्यांमधील अंतर्गत वादातून संस्थेचे संचालक वर्मा यांनी राकेश अस्थानाविरोधात तक्रार दाखल केली होती,   त्याच वर्षी २३ ऑक्टोबरला दोन्ही अधिकाऱ्यां त्यांच्या कर्तव्यातून काढून टाकण्यात आले होते.

 

माध्यमांच्या अहवालानुसार असे म्हटले आहे की अनिल अंबानी यांच्याशिवाय कंपनीच्या यादीमध्ये कॉर्पोरेट कम्युनिकेशन्सचे प्रमुख टोनी जेसुदासन आणि त्यांची पत्नी यांच्या फोन नंबरचाही समावेश आहे.

 

तिबेटी धर्मगुरू दलाई लामा आणि नागालीम राष्ट्रीय समाजवादी परिषदेच्या  नेत्यांचे सल्लागार यांची नावेही या यादीमध्ये समाविष्ट आहेत. याशिवाय दुबईची राजकन्या शेख लतीफाच्या जवळच्या नातेवाईकांची हेरगिरी करण्याची शक्यताही समोर आली आहे.

 

इस्रायली कंपनी एनएसओच्या पेगॅसस सॉफ्टवेअरद्वारे पत्रकार, मानवाधिकार कार्यकर्ते आणि राजकीय व्यक्तींसह ३०० हून अधिक व्यक्तींचे फोन हॅक केले गेले आहेत. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, भाजपचे मंत्री अश्विनी वैष्णव आणि प्रह्लादसिंग पटेल, माजी निवडणूक आयुक्त अशोक लवासा आणि निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांचे फोन नंबर इस्त्रायली स्पायवेअरवरून हॅकिंगसाठी देण्यात आले होते.

 

‘फोर्बिडन स्टोरीज’ आणि ‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनेशनल’ या संस्थेसोबत १६ माध्यमांनी केलेल्या अभ्यासात मिळविलेल्या ५०,००० हून अधिक फोन क्रमांकाच्या यादीतून देशांमधील एक हजाराहून अधिक व्यक्तींची ओळख पटविली आहे.

 

Exit mobile version