Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

संयुक्त राष्ट्र संघाची भांगेला औषध म्हणून मान्यता

व्हिएन्ना: वृत्तसंस्था । हजारो वर्षांपासून भांगेचा वापर हा मादक पदार्थ आणि औषध म्हणून करण्यात येतो. जगभरात भांगेचा असा वापर करण्यात येतो. आता संयुक्त राष्ट्र संघाने भांगेचा वापर औषध म्हणून करण्यास मान्यता दिली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारसीनंतर संयुक्त राष्ट्र संघाच्या अंमली पदार्थ आयोगाने भांगेला अंमली पदार्थाच्या यादीतून वगळले आहे.

संयुक्त राष्ट्र संघाने औषध म्हणून मान्यता दिली असली तरी वैद्यकीय कारण वगळून इतर कारणांसाठी त्याचा वापर करण्यास बंदी आहे. संयुक्त राष्ट्राच्या अंमली पदार्थाच्या यादीतून भांगेला वगळण्याबाबत मतदान झाले. यावेळी २७ सदस्य देशांनी प्रस्तावाच्या बाजूने आणि २५ सदस्यांनी प्रस्तावाविरोधात मतदान केले. या ऐतिहासिक मतदानात अमेरिका आणि ब्रिटनने यादीतील बदलाच्या बाजूने मतदान केले. तर, भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, नायजेरिया, रशिया आदी देशांनी या प्रस्तावाच्या विरोधात मतदान केले.

संयुक्त राष्ट्राच्या मान्यतेनंतर भांगेपासून तयार करण्यात आलेल्या औषधांची मागणी असणाऱ्या देशांचा फायदा होणार आहे. त्याशिवाय भांगेच्या औषधी गुणधर्माबाबत अधिक संशोधन होण्याची शक्यता आहे.

भारतात हजारो वर्षांपासून भांगेचा वापर करण्यात येतो. धार्मिक कर्मकांडातही त्याचा वापर करण्यात येतो. चीन आणि इजिप्तमध्येही भांगेचा वापर हजारो वर्षांपासून औषध म्हणूनच करण्यात येतो. संयुक्त राष्ट्र संघाने मान्यता दिल्यामुळे आता अनेक देशांना भांगेचा वापर औषध म्हणून करता येणार आहे. जगभरातील ५० हून अधिक देशांमध्ये भांगेचा वापर करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. कॅनडा, उरुग्वे आणि अमेरिकेतील १५ राज्यांमध्ये भांगेचा औषधी वापर करण्यास परवानगी आहे.

Exit mobile version