Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

संभाजीराजे म्हणाले, “बेमुदत उपोषण करण्याची माझी तयारी आहे”

 

पुणे : वृत्तसंस्था । मराठा आरक्षणासाठी आता थेट मुंबईतील आझार मैदानावर लाक्षणिक किंवा बेमुदत उपोषण करण्याची घोषणा संभाजीराजेंनी केलीय.

 

मराठा आरक्षणावरुन आंदोलन पुकारणारे भाजपा खासदार संभाजीराजेंनी पुन्हा एकदा लढा सुरु करण्याचा इशारा दिला आहे. आता पुढच मूक आंदोलन नांदेड येथे होणार असल्याचं संभाजीराजेंनी पुण्यामधील मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीमध्ये म्हटलं आहे. तसेच मी सुद्धा आता तेच तेच बोलून थकलोय अशा शब्दात त्यांनी आपली या मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन होत असलेल्या विलंबाबद्दलची नाराजी व्यक्त केलीय.

 

“माझी एकट्याची आझाद मैदानावर लाक्षणिक किंवा बेमुदत उपोषणास करण्याची  तयारी आहे. तुम्हीच ठरवा आणि सांगा,” असं संभाजीराजेंनी या बैठकीमध्ये सहभागी झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना आणि कार्यकर्त्यांना सांगितलं आहे. २० ऑगस्ट रोजी नांदेड येथे मूक आंदोलन होणार होणार असल्याची घोषणा या कार्यक्रमामध्ये मराठा क्रांती मूक मोर्चा समन्वयकांनी केलीय.

 

१५ जुलै रोजीच संभाजीराजेंनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व उपसमितीच्या सदस्य मंत्र्यांना पत्र लिहिलं असून आपली नाराजी जाहीर केली होती. “मराठा समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी केलेल्या मूक आंदोलनाची दखल घेऊन राज्य शासनाने दि. १७ जून रोजी बैठक घेतली. या बैठकीत समाजाच्या मागण्या शासनस्तरावर मान्य करण्यात आल्या. त्यांच्या पूर्ततेसाठी प्रशासनाने कालावधी मागितला होता. मात्र एक महिना पूर्ण होऊनदेखील प्रशासनाने कार्यवाही केलेली नाही,” असं यावेळी संभाजीराजेंनी म्हटलं होतं.

 

“सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे शैक्षणिक व शासकीय नोकऱ्यांमधील आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजास शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम करणाऱ्या काही मागण्या समाजामार्फत आम्ही राज्य शासनाकडे मांडल्या होत्या. आरक्षणाइतक्याच या मागण्या महत्त्वपूर्ण असून या मागण्यांच्या पूर्ततेनंतर मराठा समाजाच्या सर्वांगीण उन्नतीस हातभारच लागणार आहे. या मागण्या पूर्ण करण्यासाठी समाजास वेठीस न धरता थेट लोकप्रतिनिधींची भूमिका जाणून घेण्यासाठी आम्ही मूक आंदोलनाचा पर्याय निवडला. दि. १६ जून रोजी कोल्हापूर येथे झालेल्या मूक आंदोलनानंतर राज्य शासनाने आम्हाला मागण्यांबाबत निर्णय घेण्यासाठी बैठकीस निमंत्रित केले. दि. १७ जून रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मराठा आरक्षण मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष व सदस्य मंत्रीगण, राज्याचे महाधिवक्ता यांचेसह राज्यातील प्रमुख समन्वयक व संबंधित सर्व शासकीय विभागांचे मुख्य सचिव व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते,” अशी आठवण संभाजीराजेंनी करुन दिली होती.

 

 

“या बैठकीत समाजाच्या प्रमुख मागण्यांविषयी सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व उपस्थित मंत्रीगणांनी समाजाच्या मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद दर्शविला असता, उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यानुसार कार्यवाही करून मागण्यांची पूर्तता करणेबाबत आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करणेसाठी कालावधी मागितला होता. याबाबत राज्य शासनाचे वतीने करण्यात आलेल्या विनंतीनुसार आम्ही नियोजित मूक आंदोलन एक महिना पुढे ढकलले होते. हा एक महिन्याचा अवधी संपत आला असून राज्य शासनाने बैठकीत घेतलेल्या निर्णयांची पूर्तता व अंमलबजावणी करणेसाठी प्रशासनाने कोणतीही ठोस कार्यवाही केल्याचे दिसून येत नाही,” अशी खंत संभाजीराजेंनी व्यक्त केली होती.

 

“राज्य शासनाने समाजाच्या बहुतांश मागण्या मान्य जरी केल्या असल्या, तरी प्रशासनाच्या बेपर्वाईमुळे यावर अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. तरी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष व सदस्य मंत्रीगण यांनी या सर्व परिस्थितीचा गांभिर्याने विचार करून, संबंधित सर्व प्रशासकीय विभागांकडून मागण्यांबाबत झालेल्या निर्णयांचा कार्य अहवाल त्वरीत मागवून या मागण्या मार्गी लावून त्यांची तात्काळ प्रभावी अंमलबजावणी करावी, अन्यथा आमचा लढा आम्ही पुन्हा सुरू करू,” असा इशाराच संभाजीराजेंनी दिला होता. आज अशाच पद्धतीने त्यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीमध्ये इशारा दिला असून नांदेडमध्ये मूक आंदोलन करणार असल्याचं म्हटलं आहे.

 

नीरज चोप्राचा सत्कार करण्याचा ठराव पुण्यामधील या बैठकीमध्ये मांडण्यात आला. भारताच्या नीरज चोप्राने ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे. नीरजने भालफेक स्पर्धेच्या अंतिम फेरी पहिल्याच प्रयत्नात ८७.०३ मीटर तर दुसऱ्या प्रयत्नात ८७.५८ मीटरपर्यंत भाला फेकत सुवर्णपदकावर नाव कोरलं. “रोड मराठा नीरज चोप्राने ही कामगिरी केली आहे. प्रामुख्याने पाणीपत लढाईसाठी गेलेल्या मराठा समाजाच्या वंशजांना आज रोड मराठा म्हणून ओळखल्या जाते. अश्या हरयाणा स्थित मराठा समाजात जन्मलेल्या नीरज चोप्रा याचे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने अभिनंदन,” असे फलक बैठकीत लावण्यात आले. दरम्यान, महाराष्ट्र राज्य सरकारने नीरज चोप्राचा सत्कार करावा, असं यावेळी ठरवण्यात आलं.

 

Exit mobile version