Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

संप सुरूच राहणार : एसटी कर्मचाऱ्यांचा पवित्रा !

मुंबई प्रतिनिधी – परिवहन मंत्री अनिल परब यांनी जाहीर केलेली वेतनवाढ आणि नंतर आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी संपातून घेतलेली माघार यांच्या पार्श्‍वभूमीवर एसटी कर्मचारी संघटनेने जोवर विलीनीकरण होत नाही तोवर आपला लढा सुरूच ठेवण्याची घोषणा केली आहे. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचार्‍यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर काल परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांसाठी मोठी वेतन वाढ जाहीर केली. याप्रसंगी त्यांनी या वेतन वाढी नंतर तरी कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेण्याचे आवाहन केले. तर आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी आपण रात्रभर कर्मचारी संघटना आणि आंदोलकांनी सोबत चर्चा करून आज आपली भूमिका जाहीर करू असे सांगितले होते. यानुसार खोत आणि पडळकर यांनी आपण एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातून माघार घेत असल्याचे जाहीर केले. आंदोलन सुरू ठेवावे की मागे घ्यावे याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घ्यावा असे देखील त्यांनी सुचवले. या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनातील कर्मचाऱ्यांनी आपला संप कायम ठेवणार असल्याचे जाहीर केले आहे. यासंदर्भात कर्मचारी म्हणाले की आमची मागणी ही वाढीव वेतनाची नसून विलिनीकरणाची होती. यामुळे विलीनीकरणावर जोवर निर्णय होत नाही तोवर आम्ही संप चालूच ठेवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

Exit mobile version