Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

संजय राठोड राजीनामा देणार?

 

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे वनमंत्री संजय राठोड यांना मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याचे आदेश दिल्याच्या  चर्चेनं राजकीय वर्तुळात जोर धरला आहे.

 

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पूजा चव्हाण प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटण्याची चिन्हं असल्यानं मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्याचं बोललं जात असून, शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी एक सूचक ट्विट केलं आहे.

 

पूजा चव्हाण या तरुणीनं पुण्यात आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येनंतर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमुळे हे प्रकरण चर्चेत आलं होतं. त्यानंतर भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी थेट राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचं नाव घेत कारवाई करण्याची मागणी केली होती. भाजपानं मागणी लावून धरली असून, विधिमंडळाचं कामकाज चालवू देणार नाही, असा इशाराही दिला आहे.

 

दरम्यान, अधिवेशानाच्या पूर्वीचं निर्णय घेण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांना दिल्याचं वृत्त आहे.  दोन दिवसांपासून संजय राठोड यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आल्याच्या चर्चा सुरू असून, शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सूचक ट्विट करत संजय राठोड राजीनामा देणार असल्याच्या मुद्द्याककडे अप्रत्यक्षपणे अंगुली निर्देश केले आहेत. संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं छायाचित्र असलेला फोटो ट्विट केलेला आहे. त्यावर “सिंहासनाधिष्ठीत छत्रपती शिवरायांच्या हातातील हा राजदंड काय सांगतो?, महाराष्ट्र धर्म म्हणजेच राजधर्माचे पालन!”, असा मजकूर असलेलं ट्विट केलं आहे.

 

 

औरंगाबाद दौऱ्यावर असताना संजय राऊतांनी याबद्दल भूमिका मांडली होती. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे न्यायप्रिय नेते आहेत. ते मिस्टर सत्यवादी आहेत. त्यामुळे पूजा चव्हाण प्रकरणात ते संपूर्ण सत्य जाणून घेऊन योग्य तो निर्णय घेतील. ते कुणावरही अन्याय करणार नाहीत आणि कुणाला पाठीशीही घालणार नाहीत. उद्धव ठाकरे आणि संजय राठोड यांच्यात बोलणं झालेलं असलं तरी त्याविषयी मी बोलणं संकेताला धरून नाही,” असं राऊत म्हणाले होते.

Exit mobile version