Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

संजय राऊत शरद पवारांचे प्रवक्ते आहे का — नाना पटोलें

 

मुंबई:  वृत्तसंस्था । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ‘यूपीए’च्या अध्यक्षपदासाठी शरद पवार यांचे नाव सुचवले होते. यावरुन काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊत हे शरद पवार यांचे प्रवक्ते आहेत का, असा सवाल केला. 

ते मुंबईतील पत्रकारपरिषदेत बोलत होते. काँग्रेसचे नेते याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलले आहेत. मुळात शिवसेना यूपीएचा भागच नाही. त्यांना याबाबत चर्चा करण्याचा किंवा मत नोंदवण्याचा अधिकारच नाही, असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता यावर संजय राऊत काय प्रतिक्रिया देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे डोळे लागले आहेत.

 

संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर दिल्लीतील काँग्रेसचे नेतेही नाराज झाल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी फोनवरुन चर्चा केली होती. काँग्रेसची नाराजी दूर करण्यासाठी सुप्रिया सुळे यांनी मध्यस्थी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

 

संयुक्त पुरोगामी आघाडीच्या प्रमुखपदी शिवसेनेने शरद पवार यांचे नाव सुचवल्यामुळे काँग्रेस पक्ष नाराज झाल्याचा दावा संजय राऊत यांनी फेटाळून लावला. यूपीए आणखी मजबूत व्हायला पाहिजे, असे काँग्रेसमधील अनेक नेत्यांचे म्हणणे आहे. सोनिया गांधी यांनी प्रदीर्घकाळ यूपीएचे अध्यक्षपद भुषविले आहे. मात्र, सध्या सोनिया गांधी यांची प्रकृती ठीक नसते. देशात वेगळ्याप्रकराच्या घडामोडी घडत आहेत. अशावेळी यूपीएचे नेतृत्त्व काँग्रेसबाहेरील नेत्याने करावे, असे देशातील अनेक पक्षांचे  म्हणणे आहे , असे ते म्हणाले .

 

मनसुख हिरेन हत्याप्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना कॉल डिटेल्स रेकॉर्डचा (CDR) उल्लेख केला होता. हा सीडीआर खोटा आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे खरा सीडीआर असेल तर त्यांनी तो प्रसारमाध्यमे आणि जनतेला दाखवावा. देवेंद्र फडणवीस हे खोटा सीडीआर दाखवून राज्याला बदनाम करण्याचे काम करत आहेत, असा आरोप नाना पटोले यांनी केला.

Exit mobile version