Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

संजय राऊत, कंगनाशीही उच्च न्यायालय असहमत

मुंबई वृत्तसंस्था । अभिनेत्री कंगना राणावतने मुंबई आणि महाराष्ट्राविषयी काय म्हटले, त्याच्याशी आम्हीही सहमत नाही. आपण सर्व महाराष्ट्रीयन आहोत आणि आम्हालाही महाराष्ट्रीयन असल्याचा अभिमान आहे’, असे अत्यंत महत्त्वाचे निरीक्षण आज मुंबई हायकोर्टाने नोंदवले. कंगनाने केलेल्या वक्तव्यावर अशा पद्धतीने प्रतिक्रिया देणे योग्य आहे का?, असा सवालही कोर्टाने शिवसेना नेते संजय राऊत यांच्या विधानावर यावेळी विचारला.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या ‘कानून क्या है’ या विधानाचा समाचार घेताना मुंबई हायकोर्टाचे कठोर निरीक्षणे नोंदवली. ‘संजय राऊत हे नेते आहेत, ते कोणी सर्वसामान्य माणूस आहेत का? याचिकादाराने जे काही म्हटले त्याच्याशी आम्हीही सहमत नाही. परंतु त्याच्यावर अशाप्रकारे प्रतिक्रिया द्यायची का? ही पद्धत असते का बोलायची? ते नेते असल्याने त्यांनी उदारतेने त्याकडे पाहून दुर्लक्ष करायला हवे होते. ते असे काही तरी बोलून हीच शिकवण इतरांना देत आहेत का?’, अशा शब्दांत न्या. शाहरुख काथावाला व न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठाने नाराजी व्यक्त केली.

‘मी एका वृत्तवाहिनीला ५ सप्टेंबर रोजी दिलेल्या मुलाखतीत कंगनाला अपशब्द किंवा आक्षेपार्ह भाषा वापरून धमकावलेले नाही, मी या आरोपांचे खंडन करतो’, असे म्हणणे संजय राऊत यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात मांडले आहे. वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कंगनाविषयी बोलत होतो, हे खरे आहे. परंतु, तिला कोणत्याही प्रकारे धमकी दिली नाही. तिने महाराष्ट्राविषयी आक्षेपार्ह भाषा वापरल्याने प्रतिक्रिया दिली. कानून क्या है, म्हणताना कायद्याचा अनादर करण्याचा हेतु नव्हता, असे म्हणणेही संजय राऊत यांच्यातर्फे वकिलांनी मांडले. त्यावर कोर्टाने आपली महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली.

संजय राऊत यांच्यातर्फे आज युक्तिवाद मात्र होऊ शकला नाही. राऊत यांचे वकील अॅड. प्रदीप थोरात यांच्या सासऱ्यांचे आज दुपारी १२.३० वाजता निधन झाले. त्यामुळे ते आज युक्तिवाद मांडण्यास असमर्थ आहेत, असे म्हणणे थोरात यांच्या ज्युनिअर वकिलांनी कोर्टात मांडले. त्यावर मुंबई हायकोर्टाने त्यांना नंतर युक्तिवाद मांडण्याची मुभा दिली.

Exit mobile version