Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

संजय राऊत आणि आशिष शेलार यांची गुप्त बैठक !

 

मुंबई : वृत्तसंस्था । राज्यातील गुप्त भेटीचा सिलसिला आता शिवसेना-भाजपपर्यंत पोहोचल्याचं चित्र आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांची आणि भाजप आमदार आशिष शेलार यांच्याशी  भेट झाल्याची माहिती समोर आली आहे.

 

मुंबईतील नरीमन पॉईंट परिसरात दोन्ही नेत्यांची भेट झाली. या दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे.  शिवसेना-भाजप नेत्यांच्या भेटीगाठीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

गेल्या आठवड्यापासून राज्याच्या राजकारण गुप्त भेटीगाठी वाढल्या आहेत. आधी संजय राऊत यांची राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत भेट झाली होती. मग त्यानंतर संजय राऊत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले. तिथून ते लगेचच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना भेटले. यानंतर मग विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री अमित शाह यांना भेटले होते.

 

 

राजकारणात अशा भेटी होत राहतात, संजय राऊत आणि आशिष शेलार हे चांगले मित्र आहेत. आम्ही आमचं काम करत राहू आणि ते त्यांचं काम करत राहतील, शिवसेनेनं हात पुढे करण्याचा काही विषय नाही आणि तशी शक्यताही नाही, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.

 

शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या गुप्त बैठकीची चर्चा सुरु असताना, आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याही गुप्त बैठकीची माहिती समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसापूर्वी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह  यांची भेट घेतली. फडणवीस आणि अमित शाह यांच्यात तब्बल दोन तास चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. इतकंच नाही तर या बैठकीला स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी  हे सुद्धा फोनवरुन उपलब्ध होते. फडणवीस-मोदी आणि अमित शाह यांची 20 मिनिटे चर्चा झाली.

 

महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल नसल्याच्या घडामोडी सातत्याने समोर येत आहेत. कारण शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर आता नवी माहिती समोर आली आहे. सरकार वाचवण्यासाठी संजय राऊत यांच्या हालचाली सुरु असल्याचं सुरु आहे. मंगळवारी गुप्त बैठक झाली. या बैठकीला संजय राऊत, उपमुख्यमंत्री अजित पवार, मिलिंद नार्वेकर, राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे, एकनाथ शिंदे या बैठकीला उपस्थित होते.

 

एकीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या गुप्त बैठकीचं वृत्त समोर आल्यानंतर, तिकडे स्वबळाची भाषा करणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले   यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “सरकार वाचवायचा प्रश्नच नाही आम्ही तिघेही सोबत आहोत. सरकार पाच वर्ष चालेल”, असं नाना पटोले यांनी ठणकावून सांगितलं.

 

Exit mobile version