Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

संगीत संत तुकाराम नाटकास उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगाव प्रतिनिधी । संत तुकाराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भेटीवर आधारीत मसंगीत संत तुकारामम नाटकाला जळगावकर रसिकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशन, जळगाव प्रायोजित सर्वसमावेशक सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीने या नाटकाचा प्रयोग आयोजला होता.

शंभर वर्षांपूर्वीच्या या नाटकाने प्रबोधनात्मक कथानकातून भक्ती-शक्तीच्या आनंद सोहळ्याची अनुभूती देत रसिकांना खिळवून ठेवले. दर्जेदार अभिनय, संगीत आणि नेटक्या नेपथ्याने प्रयोग विशेष रंगला. आरंभी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जळगांव मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे, आ. राजुमामा भोळे, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन व मान्यवरांच्याहस्ते विठ्ठल रखुमाई, छत्रपती शिवराय, राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांना माल्यार्पण केले. यावेळी ज्ञानेश महाराव यांनी नाटकाबाबत उपस्थितांशी सुसंवाद साधला. सुरवातीला शंभू पाटील यांनी नाट्यप्रयोगाच्या आयोजनबाबत माहिती दिली.

गेल्या ३५ वर्षांपासून अधिक काळ विविध नाटकांची निर्मिती करणार्‍या ओम नाट्यगंधाने संत तुकारामची नाट्य निर्मिती समाजप्रबोधनाच्या उद्देशाने केली आहे. संगीत संत तुकाराम नाटकाचे लेखन बाबाजीराव राणे यांने केले असून संतोष पवार हे दिग्दर्शक आहेत. डॉ. राम पंडीत संगीतकार असून सुनील देवळेकर यांचे नेपथ्य नाटकाला लाभले आहे. ज्ञानेश महाराव हे निर्माते आहेत, तर सूत्रधार उदय तांगडी, रवींद्र पिंपळकर हे आहेत. तुकोबा-शिवराय यांच्या भेटीचा महिमा सांगणार्‍या या नाटकातील बुवा-बाजीवर प्रहार आणि तुकोबांनी शिवबांना केलेला उपदेश हे दोन्ही आजच्या कार्यकर्त्यांसाठी आणि नागरिकांसाठी मार्गदर्शक आहे.

नाटकात संवादाच्या रूपाने कथानक पुढे सरकत जाते आणि विनोदाची पखरण करत रसिकांना खिळवून ठेवले. बा रे पांडुरंगा केव्हा भेट देशी… हा अभंग नाटकात वापरला होता. तुकारामाची भूमिका साकारणारे आजगावकर यांनी केलेले गायन रसिकांची उत्स्फुर्त दाद मिळवून गेले.

जळगाव येथील छत्रपती राजे संभाजी नाट्यगृहात ओम नाट्यगंधा संस्था निर्मित मसंगीत संत तुकारामम नाटकाचा प्रयोग सादर झाला. या प्रबोधनात्मक नाटकातून संत तुकाराम यांचा भक्तिमार्ग आणि शिवाजी महाराजांच्या स्वराज्य मार्गावर प्रकाशझोत टाकण्यात आला. वैराग्याकडे वळत असलेल्या शिवरायांना उपदेश करून तुकारामांनी रयतेचे कल्याण करण्याचा उपदेश केला. सुश्राव्य अभंग आणि गीतांनी नाटक अधिक चित्तवेधक ठरले. या नाटकात विक्रांत आजगावकर यांनी साकारलेली संत तुकाराम आणि प्रीती बने यांची जिजाईची भूमिका सर्वाधिक दाद घेऊन गेली. मयूरेश कोटकर, प्रीती बने, कुशल कोळी, सुजीत मेस्त्री, देव कांगणे आणि ज्ञानेश महाराव यांच्या मुख्य भूमिका होत्या.

Exit mobile version