Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

श्री सिद्धी महागणपतीच्या प्रतिष्ठापनेला सुरुवात

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । श्री सिद्धिविनायक वेंकटेश देवस्थान जळगावच्यावतीने पाळधी येथे गणपती बाप्पाची ३१ फुटी उंच भव्य मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात येत आहे. प्रतिष्ठापना सोहळ्याला ७ फेब्रुवारी रोजी सुरूवात झाली.

पहिल्याच दिवशी मूर्तीची पूजाअर्चा करण्यात येऊन संकल्प सोडण्यात आला. याचबरोबर नान्दीश्राद्ध, गणपती मातृका पूजन, दशविध स्नान हवन, नित्य आराधना, जलयात्रा व अभिषेक करण्यात आला. शेकडो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तीभावाने प्रतिष्ठापनेला सुरुवात झाली.

 

मंगळवार ७ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी दरम्यान हा प्रतिष्ठापनेचा धार्मिक सोहळा पार पडणार आहे. तब्बल सोळा दिवस चालणाऱ्या या प्रतिष्ठापनेच्या सोहळ्यात नऊ अग्निकुंड धगधगत असणार असून दोन लाख ५१ हजार आहुती अर्पण करण्यात येणार आहे. याचबरोबर सोळा ही दिवस भक्तांना प्रसादाचा लाभ घेता येणार आहे.

 

गणेश स्थापनेचा भव्य दिव्य सोहळा श्री सिद्ध व्यंकटेश देवस्थान जळगावतर्फे करण्यात येत आहे. जळगावपासून अगदी जवळच असलेल्या पाळधी येथे महामार्गालगत हा सोहळा सुरू आहे. भक्तांनी मोठ्या प्रमाणावर या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. ८ रोजी गणपती पूजन, मंडप पूजन, मंडलादि आराधना, अरणी मंथन, अग्नी स्थापना, हवन प्रारंभ, नेत्र बंधन, नित्य आराधना, अंकुर रोपण व ध्वजारोहण करण्यात आले.

Exit mobile version