Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिरासाठी रंगनाथ महाराज यांचा आजन्म झोळीचा संकल्प

पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पहूर शेंदुर्णी मार्गावर पहूर गावापासून अवघ्या २ किलोमीटर अंतरावर देवळी आणि गोगडी या पवित्र नद्यांच्या संगमावर वसलेले श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर हे महाराष्ट्र राज्य शासनाच्या ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत ‘ क ‘ वर्ग दर्जा प्राप्त तीर्थक्षेत्र असून हे पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान आहे.

या मंदिराच्या सर्वांगीण विकासाच्या ध्येयाने प्रेरित होऊन मंदिराचे पुजारी तथा ट्रस्टचे अध्यक्ष शिवभक्त रंगनाथ महाराज यांनी विजयादशमीपासून आजन्म झोळीचा संकल्प केला आहे. या भिक्षा झोळीतून प्राप्त झालेल्या लोकवर्गणीतून मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास साधला जात आहे. या विकास कामांचा भाग म्हणून नुकतेच पोलीस दल आणि सैन्य दलाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज मैदानाचे भूमिपूजन करण्यात आले. मैदानाची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. या मैदानाच्या सुशोभनासाठी तसेच श्रीक्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर परिसर सुजलाम सुफलाम व्हावा यासाठी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन, देवळी व गोगडी या नद्यांचे संवर्धन, स्वच्छता, नद्यांचे खोलीकरण, मंदिर परिसरातील संत निवास भक्त निवास, पाण्याची टाकी या वास्तूंचे संवर्धन व नूतनीकरण, नैसर्गिक प्रवाहांचे संवर्धन जोपासना करण्यात येत आहे. पहूर आणि पंचक्रोशीतील भाविकांनी या धार्मिक कार्यास सढळ हाताने मदत व सहकार्य करावे, असे आवाहन शिवभक्त रंगनाथ महाराज यांनी केले आहे.

Exit mobile version