Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शैक्षणिक दर्जा घसरविणाऱ्या अकार्यक्षम कुलगुरूंनी तात्काळ राजीनामा द्यावा  ; जिल्हाध्यक्ष मराठे(व्हडिओ )

 

जळगाव, प्रतिनिधी । काल केंद्रीय मनुष्यबळ विकास विभागातर्फे भारतामधील सर्व विद्यापीठांच्या राष्ट्रीय संस्था मूल्यमापन रँकिंग (एनआयआरएफ) जाहीर करण्यात आली. यात कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला रँकिंगमध्ये तब्बल 181 वे स्थान मिळाले. विद्यापीठाचा रँकिंगमध्ये शैक्षणिक दर्जा घसरविणाऱ्या व संपूर्ण विद्यापीठाचे पानिपत करणाऱ्या प्रशासन शून्य अनुभव असणाऱ्या कुलगुरू डॉ पी पी पाटील यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी जळगाव जिल्हा एनएसयूआयच्या वतीने जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी काढलेल्या एका पत्रकाद्वारे केली

संपूर्ण उत्तर महाराष्ट्राला शरमेने मान खाली घालावी लागेल यासारखे धक्कादायक म्हणजेच आपल्या कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला रँकिंगमध्ये तब्बल 181 वे स्थान मिळाले. विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा ठरविणाऱ्या एनआयआरएफ म्हणजेच राष्ट्रीय मूल्यमापन रँकिंग यामध्ये आपल्या विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा इतका खालावला आहे की विद्यापीठाला तब्बल 200 च्या जवळपास राष्ट्रीय रँकिंग मिळालेली आहे. ही अतिशय गंभीर अशी बाब संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थी व पालकांसाठी निर्माण झालेली आहे.

नेमकं विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा घसरविण्यासाठी जबाबदार कोण..?
वेळोवेळी महाराष्ट्र शासनाकडून कोट्यावधीचा निधी विद्यापीठाला मिळून देखील विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा दिवसेंदिवस का घसरतो आहे..? व याला जबाबदार नेमकं कोण..? असा प्रश्न उत्तर महाराष्ट्र मधील संपूर्ण विद्यार्थी व त्यांच्या पालकांना पडलेला आहे. त्यासंबंधी जळगाव जिल्हा यांच्यावतीने खुलासा करण्यात येत आहे की, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.पी पी पाटील हे अतिशय अकार्यक्षम, कोणताही निर्णय स्वतः वरून घेऊ न शकणारे व प्रशासकीय अनुभव शून्य असणारे व्यक्तिमत्त्व आहे.

आजपर्यंत विद्यापीठाने विद्यार्थी हिताचे कुठलेही निर्णय घेतलेले नाहीत

त्याच पद्धतीने ज्या व्यक्तींना बाहेर आपले स्वतःचे क्लासेस देखील चांगल्या पद्धतीने चालवता आले नाहीत, अशा व्यक्तींना केवळ भाजप सरकार होते म्हणून व संघ विचारधारेचे असल्यामुळे लायकी नसताना देखील राज्यपाल महोदयांनकडून आयते पदे घेऊन विद्यापीठांमध्ये नियुक्त झालेले आहेत व केवळ राज्यपाल महोदयांच्या भरवशावर ती विद्यापीठांमध्ये सर्वच कामांमध्ये ढवळाढवळ करत विद्यापीठाचा संपूर्ण शैक्षणिक भौगोलिक व आर्थिक दर्जा घसरविण्यासाठी जबाबदार आहेत.

जनाची नव्हे तर मनाची तर लाज वाटू द्या

जळगाव जिल्हा एनएसयूआय च्या वतीने आमची मागणी आहे की, विद्यापीठाचे शैक्षणिक नुकसान करणाऱ्या या लोकांना जनाची नव्हे तर मनाची लाज वाटत असेल तर स्वतःहून अकार्यक्षम कुलगुरू डॉ पी पी पाटील व आयते पदे घेऊन आलेल्या लोकांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. जेणेकरून एखाद्या सक्षम व कार्यक्षम व्यक्तीला तिथे काम करण्यासाठी संधी मिळेल .

शैक्षणिक दर्जा असाच घसरला तर नोकऱ्या देखील मिळणार नाहीत

भविष्यामधील उत्तर महाराष्ट्र मधील लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य देखील चांगल्या पद्धतीने जोपासले गेले पाहिजे अन्यथा हे बेजबाबदार लोक अजून काही काळ विद्यापीठामध्ये राहिल्यास विद्यापीठामधील उत्तर महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांमधील लाखो विद्यार्थ्यांना पुणे व मुंबई येथील कंपन्यादेखील नोकऱ्या देणार नाहीत. त्यामुळे अशा बेजबाबदार लोकांची तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी अशा प्रकारची मागणी जळगाव जिल्हा एनएसयूआयच्यावतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांच्याकडे केलेली आहे.

 

 

Exit mobile version