Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शेतीतील कामे करण्यासाठी जी. एच. रायसोनी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी बनविला “यंत्रमानव”

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग म्हणून ओळखले जाते. या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे आपले जीवन अतिशय सुधारले आहे. मानव हा नवीनवीन गोष्टींचा शोध लावत आहे. या उपलब्ध मशीन्स आणि गॅझेट्सच्या सहाय्याने मानव आपली सर्व कामे सहजरीत्या व कमी वेळात पूर्ण करत असून आपले संपूर्ण जीवन हे यंत्राद्वारे व्यापले गेले आहे. आणि असाच जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील संगणकशास्त्र, विज्ञान व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या विद्यार्थ्यांनी विकसित केलेला एक समाजाभिमुख प्रकल्प म्हणजे शेतात काम करणारे रोबोट होय.

 

सध्या जागतिक पातळीवर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशातच काही दिवसापूर्वी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शेतीमधील कामांसाठी मनुष्यबळ कमी पडत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. आणि हीच बाब लक्षात घेऊन जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या संगणक अभियांत्रिकी विभागाच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या ऐश्वर्या लुणावत, शुभांगी पाटील, दुर्गेश तायडे व प्रतिभा पाटील या विद्यार्थ्यांनी अशा संकटसमयी शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतीची विविध कामे करणाऱ्या रोबोंची निर्मिती केली आहे. या रोबोमध्ये अल्ट्रासॉनिक सेन्सर, ऑर्डीनो बोर्ड, जंप वायर, बॅटरी, जीपीएस कंट्रोलर, वॅाटर कंट्रोलर, 9 व्हॅटची बॅटरी, मायक्रो कंट्रोलर व आदी बसवण्यात आले आहे. यामुळे जी. एच. रायसोनी अभियांत्रिकीच्या विध्यार्थ्यानी तयार केलेला हा रोबो शेतीमधील सर्व कामे कमीत कमी वेळात सहजरीत्या करत असल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा नक्कीच भविष्यात फायदा होणार असल्याचे मत संस्थेचे कार्यकारी संचालक श्री. प्रितमजी रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व संगणकशास्त्र, विज्ञान व माहिती तंत्रज्ञान विभागप्रमुख प्रा. डॉ. सोनल पाटील व्यक्त केले.

 

हा रोबोट काय काम करेल

हा रोबो जीपीएस सिग्नलद्वारे बियाणांची तपासणी करून रेकॉर्ड ठेवेल तसेच, हा रोबो सौऊर्जेवर काम करणार आहे. दरम्यान, हा रोबो पिकाच्या आरोग्याची अचूक पाहणी करणार असून, पिकावरील रोगांचा प्रादुर्भाव आणि त्या पिकांला आवश्यक असणाऱ्या खताच्या मात्रा याची माहिती देणार आहे. तसेच जी. एच. रायसोनी अभियांत्रिकीच्या असलेल्या ऐश्वर्या लुणावत, शुभांगी पाटील, दुर्गेश तायडे व प्रतिभा पाटील या चौघांनी सलग दोन वर्षे संशोधन करून पिकाच्या उत्पन्न वाढीसाठी पिकांची पाहणी करुन पिकांवर कोणकोणत्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. पिकाचा रंग, उंची आणि पीक वाढीस कोणकोणत्या अन्नद्रव्य, खतांची गरज आहे याचे अचूक विश्लेषण करणारे सॉफ्टवेअर विकसित केले आहे. त्यानंतर त्यांनी स्वयंचलित रोबोट तयार केला आहे. हा चारचाकी रोबो पिकात फिरून पिकाची पाहणी करतो. विध्यार्थ्यातर्फे एरंडोल तालुक्यात या रोबोचे प्रात्यक्षिकही शेतकऱ्यांना नुकतेच दाखविण्यात आले. या तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याची माहिती ऐश्वर्या लुणावत यां प्रकल्पप्रमुख विध्यार्थिनीनी दिली.

 

“शेतातील रोबोट” बनवण्यासाठी किरकोळ खर्च

शेतीची विविध कामे करणाऱ्या रोबोंची निर्मिती करण्यासाठी फक्त दोन हजार रुपये खर्च आला असून याचे पेटंट मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. तसेच भविष्यात शेतकऱ्यांसाठी यापेक्षा अधिक चांगला आणि कमी खर्चात “शेतातील रोबोट”  तयार करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत, अशी आशा विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केली.

Exit mobile version