शेतात कचरा टाकण्यावरून कुटुंबावर प्राणघातक हल्ला; तिघांवर गुन्हा दाखल

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेतात कचरा टाकण्याच्या कारणावरून विवाहितेसह पती, सासरे व दीराला बेदम मारहाण केल्याची घटना तामसवाडी येथे घडली आहे. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वैशाली संजय पवार (वय-३५) रा. शास्त्री नगर, तामसवाडी ता. पारोळा ह्या पती, सासरे व दीर यांच्यासह वास्तव्याला आहे. १८ जून रोजी पवार कुटुंबिय हे शेतातील कचरा जमा करण्यासाठी गेले होते. त्यांच्या शेताच्या बांधाला शिवाजी विक्रम पवार यांचे शेत आहे. शिवाजी पवार यांनी शेतातील कचरा वैशाली पवार यांच्या शेतात टाकला. याचा जाब विचारण्यासाठी गेल्या असता शिवाजी विक्रम पवार, रोहित शिवाजी पवार आणि कल्पनाबाई शिवाजी पवार सर्व रा. तामसवाडी ता.पारोळा यांनी शिवीगाळ करून वैशाली पवार यांचे सासरे रमेश बाबूराव पवार , दीर राजेंद्र रमेश पवार आणि पती संजय रमेश पवार यांना शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने मारहाण केली. यात दीर राजेंद्र पवार यांच्या डोक्याच्या मागे चाकूने वार करून जखमी केले तर इतरांना बेदम मारहाण केली. याबाबत वैशाली संजय पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजी विक्रम पवार, रोहित शिवाजी पवार आणि कल्पनाबाई शिवाजी पवार सर्व रा. तामसवाडी ता.पारोळा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड करीत आहे.

Protected Content