Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शेतकऱ्यांच्या कापसाला हमी भाव देण्याची राष्ट्रवादीची मागणी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कापसाला १५ हजार प्रतिक्विंटल भाव द्यावा या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी १८ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता निषेध आंदोलन करत जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, परतीच्या पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे, उभी पिके वाया गेली आहेत, शेतकऱ्यांच्या हाती येणाऱ्या पिके वाया गेल्याने राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. ज्या शेतकऱ्यांची पिके या पावसाच्या फटक्यावरून वाचले आहेत, त्या पिकांना योग्य दर मिळण्याची गरज आहे. बळीराजा शेतात कष्ट उपसून दिवस-रात्र काम करत आहे. परंतु सरकार कापसाला कवडीमोड भाव देऊन त्यांची प्रतारणा करीत आहे. लहरी निसर्गानेही शेतकऱ्यांची हेळसांड केली असून अस्मानी सोबत सुलतानी संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. अशा बिकट परिस्थितीत सरकारने आर्थिक मदत करून शेत कापसाला प्रतिक्विंटल दीड हजार रुपयांचा भाव देण्यात यावा जेणेकरून त्याला पुढच्या पेरणीसाठी उभारी मिळेल. या मागणीसाठी बुधवारी १८ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.

याप्रसंगी जिल्हा कार्याध्यक्ष दीपक पाटील, तालुकाध्यक्ष विनायक चव्हाण, युवक जिल्हा सरचिटणीस अनिल खडसे, गोरख पाटील, संतोष सपकाळे, भावलाल भिल, विजय पाटील, मनोज पाटील, धवल पाटील, ज्ञानेश्वर चौधरी, सागर पाटील, मंगेश पाटील, बिपिन चौधरी यांच्यासह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Exit mobile version