Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शेतकर्‍याची लुट करणारी टोळी अटकेत

पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी | कपाशी व्यापार्‍याला धाक दाखवून सात लाख रूपयांची लुट करणार्‍या पाच जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

याबाबत वृत्त असे की, सोनाळा येथील संजय रामकृष्ण पाटील हे पहूर येथे कपाशीचा व्यापार करतात. काल ते नेहमीप्रमाणे सोनाळा गाव येथील राहत्या घरापासून पहूरकडे निघाले होते. सोनाळा ते सोनाळा फाटा दरम्यान सकाळी आठ वाजेच्या सुमारास तलावाजवळ थांबलेल्या दोघांनी संजय पाटील यांचे मोटरसायकल काढून घेतली. आणि चाकूचा धाक दाखवत त्यांच्याजवळ असलेले सात लाख रुपये लुटल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पहूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, या प्रकरणी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.किरणकुमार बकाले व त्यांच्या पथकाने पाच लुटारूंना मुद्देमालासह अटक केली आहे. एलसीबीच्या पथकाने अटक केलेल्यांमध्ये गोपाळ हरी पाटील (सोनाळा ता.जामनेर), प्रवीण रमेश कोळी (वाल्मिक नगर जळगाव), गोपाळ श्रावण तेली (कळमसरा ता. पाचोरा), प्रमोद कैलास चौधरी (कळमसरा ता. पाचोरा), लखन दारासिंग पासी (जळगाव) यांचा समावेश आहे. या अटकेतील आरोपींकडून ४ लाख ७४ हजार ४६० रुपये, गुन्ह्यात वापरलेले हत्यार, कट्टा, ५ मोबाईल, २ मोटार सायकली असा एकूण ५ लाख ९६ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

Exit mobile version