Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शेतकरी , सलून चालकांसह सर्वच छोट्या व्यापाऱ्यांना न्याय द्या ; पटोले यांचे मुख्यमंत्रांना पत्र

 

 

मुबई : वृत्तसंस्था । राज्य शासनाने कोरोना पॅकेजमध्ये शेतकरी, सलून दुकानदार, फुल विक्रेते, टॅक्सी चालक, मासळी विक्रेते, मुंबईतील डबेवाले व छोटे व्यावसायिक यांचा समावेश नाही. संचारबंदीत हे घटकही प्रभावित होत  असल्याने त्यांनाही  न्याय द्यावा, अशी मागणी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

 

या संदर्भात पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले असून या पत्रात म्हटले आहे की, “राज्यात कोरोना महामारीची भयंकर स्थिती पाहता महाराष्ट्र शासनाने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी संचारबंदी घोषित केली आहे, त्याचे काँग्रेस पक्षाच्यावतीने स्वागत आहे. लोकांचे जीव वाचविणे ही आपली प्राथमिकता असून त्यासाठी काँग्रेस पक्ष खंबीरपणे आपल्यासोबत उभा आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत झालेल्या चर्चेनुसार संचारबंदी कालावधीसाठी छोट्या व्यावसायिकांकरिता आपण पॅकेज जाहीर केले आहे, त्याबद्दल काँग्रेसच्या वतीने आपले मनस्वी स्वागत आहे. मात्र या पॅकेजमध्ये अजून काही घटकांचा समावेश करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी काँग्रेसची आग्रही भूमिका राहणार आहे.”

 

“संचारबंदीच्या कालावधीत भाजीपाला, फळबागायती व फुलांच्या शेती व्यवसायावर मोठा परिणाम होणार आहे. या कालावधीत मार्केटमध्ये मालाचा उठाव मोठया प्रमाणावर होत नाही, परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार, तसेच सलूनचे दुकान बंद असल्याने या व्यावसायिकांचेही मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.  या कालावधीत सर्व धार्मिक स्थळांवर बंदी असल्याने फुल विक्रेत्यांवरही उपासमारीची वेळ येणार आहे. मुंबईतील महत्वाचा घटक असलेल्या डबेवाल्यांचाही या पॅकेजमध्ये समावेश करून या घटकांना लाभ द्यावा”, असे पटोले यांनी पत्रात म्हटले आहे.

Exit mobile version