Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शेतकरी आंदोलन : ५ प्रमुख विरोधी नेते उद्या राष्ट्रपती यांची भेट घेणार .

 

नवी दिल्लीः वृत्तसंस्था । आता विरोधी पक्षाचे नेते ५ प्रमुख नेते उद्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत.

केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी आज ‘भारत बंद’ पुकारला होता. उत्तर भारतातील राज्यांमध्ये या बंदचा अधिक परिणाम दिसून आला. शेतऱ्यांच्या आंदोलनाला विरोधी पक्षांनीही पाठिंबा दिला आहे.

शेतकऱ्यांनी पुरकारलेल्या भारत बंदचा परिणाम आज सकाळपासून दिल्ली, उत्तर प्रदेश, हरयाणा, पंजाबसह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये दिसून आला. या ‘भारत बंद’ला २४ हून अधिक विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आणि रस्त्यावर उतरून केंद्राच्या कृषी कायद्यांचा निषेधही केला.

आता विरोधी पक्षांचे शिष्टमंडळ उद्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस , काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया ,द्रविड मुन्नेत्र कळघम , तृणमूल काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे.

माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार , काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि माकपचे सरचिटणीस सीताराम येच्युरी यांच्यासह इतर काही नेते राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. माकपचे नेते सीताराम येच्युरी यांनी ही माहिती दिली. कोविड प्रोटोकॉलनुसार फक्त पाच जणांनाच राष्ट्रपतींची भेट घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात विरोधी पक्ष राष्ट्रपतींकडे आपली भूमिका मांडणार आहेत.

सरकार आणि आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांच्या नेत्यांमध्ये उद्या बैठक होणार आहे. या बैठकीपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज अचानक शेतकरी नेत्यांना संध्याकाळी ७ वाजता चर्चेसाठी बोलावलं आहे. यामुळे या बैठकीत काय होतं, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे १३ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे.

Exit mobile version