Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शुभ वार्ता : राज्यात एकाच दिवशी ५ हजार ७१ रूग्ण बरे होऊन घरी !

मुंबई प्रतिनिधी । राज्यात एकीकडे कोरोना बाधीतांची संख्या वाढत असतांना बरे होणारेही वाढल्याचे दिसून येत आहे. यातच आज राज्यात एकाच दिवशी तब्बल ५ हजार ७१ रूग्ण बरे होऊन घरी गेल्याची माहिती आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. विशेष बाब म्हणजे राज्यात पंधरा दिवसांच्या अंतराने दुसर्‍यांदा विक्रमी संख्येत कोरोनाच्या बरे झालेल्या रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

आज राज्यभरात ५ हजार ७१ रुग्णांना दवाखान्यातून सोडण्यात आले असून मुंबई मंडळात सर्वाधीक ४२४२ एवढे रुग्ण एकाच दिवशी घरी सोडण्यात आले. आतापर्यंत ५६ हजार ४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

दि. २९ मे रोजी राज्यात एकाच दिवशी ८३८१ रुग्णांना घरी सोडण्यात आले होते. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यानंतर सातत्याने बरे होणार्‍या रुग्णांचा आलेख वाढत असून सुमारे १५ दिवसानंतर आज पुन्हा एकदा बरे होणार्‍या रुग्णांची विक्रमी संख्या गाठली आहे.

आज सोडण्यात आलेल्या ५०७१ रुग्णांमध्ये मुंबई मंडळात ४२४२ (आतापर्यंत एकूण ३९ हजार ९७६) तर त्यापाठोपाठ पुणे मंडळात ५६८ (आतापर्यंत एकूण ८४३०), नाशिक मंडळात १०० (आतापर्यंत एकूण २३६५), औरंगाबाद मंडळ ७५ (आतापर्यंत एकूण १९४५), कोल्हापूर मंडळ २४ (आतापर्यंत एकूण १०३०), लातूर मंडळ ११ (आतापर्यंत एकूण ४४४), अकोला मंडळ २२ (आतापर्यंत एकूण १०४८), नागपूर मंडळ २९ (आतापर्यंत एकूण ८११) रुग्ण घरी सोडण्यात आले आहेत.

राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्याच्या तीन महिन्यानंतर राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ४७.२ टक्के आहे. त्यात दिवसंदिवस वाढ होत असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.

Exit mobile version