Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिष्याने केला गुरुवर कोरोनाचा उपचार

 

भुसावळ प्रतिनिधी । ज्या डॉक्टर गुरूकडून वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण घेतले त्याच गुरुजींना कोरोनाच्या त्रासातून बरे करण्यासाठी शिष्याने त्यांच्यावर उपचारांची जबाबदारी घेतली आणि यशस्वीही करून दाखवली

 

डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात एमबीबीएसच्या अखेरच्या वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी  प्राध्यापक असलेल्या डॉ. नी. तू. पाटील यांचा डॉ. मयुर नितीन चौधरी हा आवडता विद्यार्थी. याच आवडत्या विद्यार्थाने आता डॉ. नी. तू. पाटील कोरोना पॉझिटिव्ह झाल्यावर त्यांच्यावर उपचार करुन एकप्रकारे गुरुदक्षिणा दिली. डॉ. पाटील यांनीही शासकिय रुग्णालयात भरती होऊन शासनाच्या सेवांवर अतुट विश्वास दाखवला.

 

नेत्ररोगतज्ज्ञ तथा भाजप वैद्यकिय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नी. तू. पाटील यांना २२ मार्चपासून कोरोना लक्षणे  जाणवू  लागली. औषधोपचार सुरु केल्यानंतर ३० एप्रिल रोजी एचआरसीच्या रिपोर्टमेंट फुफुसात ४५ ते ४८ टक्के इन्फेक्शन असल्याचे आढळून आले. यापूर्वीच संपर्कात असलेल्या ग्रामिण व ट्रामा सेंटरचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. मयुर चौधरी यांना संपर्क साधून त्यांनी ग्रामिण रुग्णालयात उपचारासाठी दाखल होण्याचा निर्णय घेतला. अनेक खासगी हॉस्पीटलचा पर्याय समोर होता , मात्र शासकिय यंत्रणेवर विश्वास ठेवत त्यांनि ग्रामिण रुग्णालयात रेमडेसिवीर इंजेक्शनचा कोर्स पुर्ण  केला  ३ एप्रिल रोजी पूर्णपणे ठणठणीत बरे झाल्याने त्यांचा डिस्जार्ज मिळाला.

 

ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. मयुर चौधरी हे डॉ. नी. तू. पाटील यांचे आवडते विद्यार्थी. डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात डॉ. पाटील यांनी डॉ. मयुर यांना विद्यादान केले होते. तर डॉ. मयुर यांनी कोविडच्या काळात डॉ. पाटील यांची सुश्रृषा करीत त्यांच्यावर उपचार करुन एकप्रकारे गुरुदक्षिणाचा दिली.  डॉ. विक्रांत सोनार, डॉ. शुभांगी पाटील, डॉ. भालचंद्र चाकूरकर, डॉ. अविनाश गवळी, सुनीता कसबे, सपना इंगळे, विद्या तायडे, इलियास शेख, गणेश चौधरी, दीपक भिरुड, महेश तायडे,  चेतन भोईटे, मोनू राजपूत, योगेश गायकवाड आदींनी सहकार्य केले.

 

डॉ. नी. तू. पाटील  कोरोनाबाधीत होऊन त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती मिळताच माजी मंत्री गिरीष महाजन यांनी त्यांना संपर्क साधून तब्बल १५ ते २० मिनिट चर्चा केली. आमदार संजय सावकारे,  भाजप वैद्यकिय आघाडीचे प्रदेश संयोजक डॉ. अजीत गोपछडे यांनीही कोविडच्या काळात घ्यावयाची काळजी बाबत सांगून तब्येतीची चौकशी केली.

 

डॉ. नी. तू. पाटील वैद्यकिय व्यवसायात असल्याने ते मोठ्या खासगी रुग्णालयामध्येही उपचार घेवू शकत होते. मात्र त्यांनी शासकिय रुग्णालयातून उपचार घेतले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोजी चव्हाण यांनीही त्यांना या निर्णयामुळे आमच्या वैद्यकिय कर्मचाऱ्यांचा हुरुप वाढल्याचे सांगितले.

 

सरकारी दवाखान्यांमधून चांगले उपचार मिळत नाही, हा लोकांचा गैरसमज आहे. खासगीच्या तोडीस तोड उपचार करुन विशेष काळजी घेतली जात आहे. कोविडच्या या बिकट काळात वैद्यकिय क्षेत्रातील डॉक्टर्स, सहकारी, परिचारीका सर्व प्रचंड मेहनत घेत आहे. यामुळे लोकांनी किमान नियम पाळून कोरोनापासून बचाव करावा. असे डॉ. नी. तू. पाटील, (  नेत्ररोग तज्ज्ञ, भुसावळ ) यांनी सांगितले

Exit mobile version