Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख ; अभिनेत्री केतकी चितळे विरुद्ध संतापाची लाट

पुणे (वृत्तसंस्था) मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे. मात्र या पोस्टमध्ये केतकीने शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने ती ट्रोल होत आहे. दरम्यान, याआधी स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआने आणि सौरव घोष खानने छत्रपती महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने अतिशय संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

 

केतकीने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे की, शिवाजी, फक्त एवढे ऐकले की आम्ही उगाच पेटून उठणार. मजकूर आम्हाला तसाही कधी कळतच नाही, कारण तेवढी आमची बुद्धीमत्ता मुळातच नाही. मग ३ वर्षाच्या मुलाची बौद्धिक पातळी असलेले स्वघोषित मावळे, शिवाजी हा एक शब्द ओळखतात आणि महाराजांच्या शिकवणीला फाट्यावर मारून, महाराजांच्या नावावर राजकारण करायचा पोकळ विनोद सुरू करतात. बरं, अशा वागण्यानी आपण आपली लायकी दाखवून देतोय हे त्यांच्या लक्षात येत नाहीच. अर्थात हे कळण्यासाठीही नखाएवढी अक्कल लागतेच म्हणा!

सोशल मिडीयावर ‘मराठी’ असा शब्द टाकून वाटेल तसा वणवा, काही लाईक्ससाठी पेटवणारे २० ते २५ वयोगटातील पोरे, ज्यांना खऱ्या आयुष्यात कुणी भाव अथवा नोकरी ही देणार नाही अशी कार्टी, या सर्कस चे रिंग मास्टर असतात. अरे मूर्खांनो, शालेय शिक्षण तरी घ्या! पण ते तरी कसे घेणार, कारण आमचे प्रेरणास्थान तर आर्ची (नाव ही मराठी नाही) आणि पर्शा! आम्ही फक्त भांडण करण्यासाठी महाराज, बाबासाहेब, फुले यांची नावे घेणार, त्यांनी लिहिलेल्या साहित्याचा अभ्यास कोण करणार!! सुधारणा करा बाळांनो, शिका, असे म्हटले होते. त्यामुळे नेटकऱ्यांनी केतकीवर चांगलीच टीका करायला सुरुवात केली आहे.

दुसरीकडे आणखी कॉमेडियन सौरव घोष खानने छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यानं अतिशय संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. मुंबईतील दोन्ही एअरपोर्टची नावं छत्रपती शिवाजी का? एकाचं नाव शिवाजी आणि दुसऱ्याचं नेपोलियन असते तर कुणी आपल्या मित्राचे लग्न मिस केले नसते ना? दुसरे काहीही नाव ठेवा. एकाचे नाव शिवाजी, दुसऱ्याचे नाव नॉट शिवाजी एअरपोर्ट, तिसऱ्याचे मे बी शिवाजी एअरपोर्ट. तुम्ही तर रेल्वे स्टेशनचे नावही शिवाजी ठेवले. शिवाजी ग्रेट वॉरियर होते. ते पर्यटनप्रेमी नव्हते,’ असे सौरव घोष खानने एका कॉमेडी सादर करताना म्हटले आहे. याबद्दल आता संताप व्यक्त होत आहे.

Exit mobile version