Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिवसेनेला मुंबईत जशास तशी टक्कर देण्याची काँग्रेसची तयारी

 

मुंबई: वृत्तसंस्था । भाई जगताप यांची मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विविध समित्यांच्या नियुक्तीनंतर सर्वांना आपल्या जबाबदारीचं वाटप करण्यात आलंय. शिवसेनेला मुंबईत जशास तशी टक्कर देण्याची काँग्रेसची तयारी सुरु आहे

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी १०० दिवसांची योजना तयार करुन सर्वांची जबाबदारी निश्चित केली आहे. त्यानंतर मुंबई काँग्रेसमध्ये कुरघोडीचं राजकारण सुरु झाल्याच्या पार्श्वभूमीवर एच. के. पाटील यांनी संपूर्ण कमान हाती घेतली आहे.

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप असले तरी एच. के. पाटील निर्णय प्रक्रियेतील प्रमुख व्यक्ती बनले आहेत. पक्षाच्या प्रवक्त्यांचीही भूमिका स्पष्ट झाली असून, त्यांना प्रत्येक आठवड्याला पत्रकार परिषद घेण्यास सांगण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबई काँग्रेसमधील जबाबदारीचं वाटप करण्यात आलं आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी भाई जगताप यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तर पक्षाच्या निवडणूक अभियानाचे प्रमुख म्हणून नसीम खान, समन्वय समिती प्रमुख अमरजीत सिंह मनहास, निवडणूक घोषणापत्र आणि प्रचार समिती प्रमुख सुरेश शेट्टी, मुंबई काँग्रेसमध्ये महाराष्ट्र काँग्रेसचे प्रतिनिधी चंद्रकांत हंडोरे, आणि कार्यकारी अध्यक्षपदी चरणसिंह सप्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

मुंबई काँग्रेसमधील नियुक्त्यांनंतर सर्वांच्या जबाबदाऱ्याही निश्चित करण्यात आल्या आहेत. कुणीही एक-दुसऱ्याच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप करु नये यासाठी या जबाबदाऱ्यांचं वाटप करण्यात आलं आहे. हे सर्वजण मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्याऐवजी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांना रिपोर्ट करतील.

मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्याकडे सदस्य नोंदणी अभियान राबवणे, मुंबई काँग्रेसचे सर्व फ्रंट, विभाग, सेलचं पुढील ४५ दिवसांत पुनर्गठन करणं, सार्वजनिक सभा करण्यापासून १०० दिवसांत १०० किलोमीटरपर्यंत पदयात्रा करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

निवडणूक अभियान समितीचे प्रमुख नसीम खान यांच्याकडे १५ जानेवारीपर्यंत निवडणूक प्रचार उपसमितीची निर्मिती, त्यातील सदस्यांची निवड करण्यापासून अजेंडा ठरवण्याचं काम देण्यात आलं आहे.

ई काँग्रेस समन्वय समितीचे प्रमुख अमरजीत सिंह मनहास यांच्याकडे मुंबई काँग्रेस, महाराष्ट्र काँग्रेस, राज्य सरकारमधील मंत्री आणि मुंबई महापालिकेत समन्वय राखण्याची जबाबादारी दिली आहे.

निवडणूक घोषणा पत्र आणि प्रचार समिती प्रमुख सुरेश शेट्टी यांच्याकडे काँग्रेसचं काम लोकांपर्यंत पोहोचवणं, भाजपच्या उणिवा शोधणं, राज्य सरकारनं राबवलेल्या जनहिताच्या योजना समोर आणणं, मुंबईच्या विकासातील मुंबई काँग्रेसचं योगदान, मुंबई काँग्रेसचा प्रचार अशा जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.

 

Exit mobile version