Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिवसेनेनं नाना पटोले यांना सुनावलं

 

मुंबई : वृत्तसंस्था । पाळत ठेवण्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेनंही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना सुनावलं आहे .

 

आपल्यावर पाळत ठेवण्यात आल्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा सरकारकडून नजर ठेवली जात असल्याचा आरोप केला होता. त्यांच्या या आरोपांमुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये वादाची ठिणगी पडली. पटोले यांनी केलेल्या विधानाचे राजकारणात पडसाद उमटले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पटोले यांनी केलेल्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला.

 

नाना पटोले यांनी गंभीर आरोप करत महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या टीकेनंतर शिवसेनेचे नेते खासदार अरविंद सावंत यांनी त्यांना सुनावलं आहे.  सावंत पटोले यांच्या विधानाबद्दल नाराजीही व्यक्त केली.

 

“नाना पटोले हे एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, ते विधानसभा अध्यक्ष राहिले आहेत त्यामुळे आपण काय बोलतोय याचं भान ठेवलं पाहिजे. नाना पटोले यांना जे काही बोलायचं आहे ते त्यांनी खाजगीत बोलावं चव्हाट्यावर बोलू नये”, असा सल्ला देत अरविंद सावंत यांनी पटोले यांना दिला आहे.

 

 

 

“तुम्हाला काही अडचण आहे, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना किंवा बाळासाहेब थोरात यांना सांगा; पण असं वक्तव्य करणं योग्य नाही. अशा लोकांमुळे मुख्यमंत्र्यांची प्रतिमा खराब होणार नाही, याचा विचार केला पाहिजे. त्यांना कसं थांबवायचं हे आता त्याचा पक्ष आणि मुख्यमंत्री निर्णय घेतील”, असं भाष्य अरविंद सावंत यांनी केलं.

 

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी केलेल्या विधानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही संताप व्यक्त केला आहे. “नाना पटोले यांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीला एकप्रकारे सुरुंग लावला जातोय. नाना पटोले हे नेते किंवा मंत्री नाहीत, ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांची भूमिका ही पक्षाची अधिकृत भूमिका मानली जाते. त्यामुळे नाना पटोले यांची भूमिका महाविकास आघाडीला कमकुवत करणारी तसेच अडचणीत आणणारी आहे,” अशा शब्दात अजित पवार यांनी भूमिका मांडली.

 

‘महाराष्ट्रात काँग्रेस उभी राहत आहे हे त्यांना माहीत आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे. मी कुठे काय करतो ते सगळे त्यांना माहीत आहे. त्यांच्याकडे मुख्यमंत्री आणि गृहमंत्रिपदाचा कार्यभार आहे. त्यामुळे यंत्रणांना सर्व रिपोर्ट त्यांना द्यावे लागतात. राज्यात कुठे काय चालू आहे, आंदोलनं कुठे होत आहे. याबद्दलची प्रत्येक अपडेट त्यांना द्यावी लागत असतात. मी कुठे काय करतो, हे सुद्धा त्यांना माहीत असते’, असं सांगत नाना पटोले यांनी महाविकास आघाडी सरकारवरमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप केला होता.

 

Exit mobile version