Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिवसेना-उबाठा पक्षाचे पदाधिकारी धरणगाव पोलिसांच्या ताब्यात !

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या ताफ्याला कपाशीने भरलेले खोके दाखविल्यामुळे शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकार्‍यांना आज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी काल जिल्ह्याचा धावता दौरा केला. यात त्यांनी अमळनेर, धरणगाव आणि एरंडोल तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. दोन दिवसात पंचानामे पूर्ण करून शेतकर्‍यांना भरपाई दिली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यांनी धरणगाव तालुक्यात देखील बांधावर जाऊन पाहणी केली.

दरम्यान, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा ताफा धरणगाव शहरातून जात असतांना शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी त्यांचा निषेध केला. याप्रसंगी त्यांच्या ताफ्याच्या समोर कपाशीने भरलेले खोके फेकण्यात आले. त्यांचा ताफा अडविण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला. अकस्मात घडलेल्या या घटनेमुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. याप्रसंगी जोरदार घोषणाबाजी करून कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा निषेध करण्यात आला.

यानंतर शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकार्‍यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी काल रात्री उशीरा हवालदार मिलिंद सोनार यांनी फिर्याद दिली. यात शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या दौर्‍याच्या कार्यक्रमात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तसेच याबाबत पोलीस स्टेशनची कोणतीही परवाणगी न घेता गैरकायदेशीर मंडळी जमविली. यातून त्यांनी जळगाव जिल्हाधिकारी यांनी लागू केलेले महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) चे उल्लघन कलम १३५ प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश लागू असतांना वरील नमुद सर्वांनी सदर आदेशाचा भंग करुन मंत्री महोदय यांच्या दौरा कार्यक्रमात गदारोळ निर्माण केल्याचे नमूद करण्यात आले.

या फिर्यादीवरून शिवसेना-उबाठा पक्षाचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, माजी नगराध्यक्ष तथा युवासेना जिल्हाप्रमुख निलेश चौधरी यांच्यासह विलास परशुराम वाघ, ऍड. शरद माळी, राजेंद्र पुंडलीक ठाकरे, विजय माधवराव पाटील, भागवत भगवान चौधरी, महेंद्र भास्कर चौधरी, भरत भगवान महाजन, राहुल रघुनाथ महाजन, बापु महाजन आणि माधव राजधर सर्यवंशी, गणेश मराठे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल झाल्यानंतर सकाळी अकरा वाजेच्या सुमारास पोलिस पथकाने संबंधीतांना पोलीस स्थानकात हजर राहण्याची सूचना दिली. या अनुषंगाने गुलाबराव वाघ, निलेश चौधरी यांच्यासह अन्य पदाधिकारी पोलीस स्थानकात हजर झाले. येथे त्यांची प्राथमिक चौकशी झाल्यानंतर या सर्वांना जळगाव येथे नेण्यात आले आहे. अर्थात, या प्रकरणी संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे दिसून आले आहे.

Exit mobile version