Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिवसेनाप्रमुखांच्या पुतळ्याचे मुंबईत अनावरण

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. बाळासाहेब ठाकरेंचा पूर्णाकृती पुतळा कुलाबा परिसरातील श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे लोकापर्ण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं.

वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन एकमेकांवर आरोपांचे फैरी झाडणारे नेते आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमात एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. महाराष्ट्राला एक चांगली राजकीय परंपरा आहे. राजकारण आणि वैयक्तिक संबंध या दोन टोकाच्या गोष्टी आहेत. हे दोन्ही टोक एकमेकांजवळ कधीच पोहोचत नाही, असा महाराष्ट्राचा इतिहास आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे प्रत्येक पक्षातील नेत्यांशी जिव्हाळ्याचा संबंध होता. महाराष्ट्राच्या राजकारणाची ही परंपरा अजूनही तशीच अबाधित आहे हे आजच्या कार्यक्रमातून सिद्ध झाले

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज कुलाबा येथील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आले . या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, महापौर किशोरी पेडणेकर, रश्मी ठाकरे, नीलम गोऱ्हे, मंत्री उदय सामंत, अमित ठाकरे आणि अनेक मंत्री, आमदार आणि खासदार उपस्थित होते.

उद्धव ठाकरे यांच्या गळ्यात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीचा सोहळा शिवाजी पार्कात घेण्यात आला. या सोहळ्याला देशभरातले प्रमुख नेते उपस्थित होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही या सोहळ्याचं निमंत्रण होतं. राज ठाकरे यांनीही या सोहळ्याला उपस्थिती लावून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यानंतर राज-उद्धव एका मंचावर आलेले नव्हते. त्यानंतर आज दुसऱ्यांदा उद्धव-राज जवळपास पंधरा महिन्यांनी एका मंचावर आले.

बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीचे तत्कालीन अध्यक्ष यशोधर फणसे यांनी ऑक्टोबर २०१५ ला गटनेत्यांच्या बैठकीत मांडला. दक्षिण मुंबईत गेटवे ऑफ इंडिया जवळील रिगल सिनेमा, छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय, महाराष्ट्र पोलीस महासंचालक कार्यालयासमोरील चौकात बाळासाहेबांचा पुतळा उभारला जाणार होता. मात्र ही जागा छोटी असल्याने पुतळ्याची जागा बदलण्यात आली.

स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केलेल्या मागणीनुसार हा पुतळा आता दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय आणि नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्टस या इमारतीसमोर डॉ.शामाप्रसाद मुखर्जी चौकातील वाहतूक बेटामध्ये उभारण्यात आला आहे.

Exit mobile version