Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिखर बँक घोटाळा ; पोलिसांच्या विरोधात अण्णा हजारे न्यायालयात

 

मुंबई : वृत्तसंस्था । शिखर बँक घोटाळा झाल्याचा पुरावा पुढे आलेला नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य ६९ जणांविरोधातील तपास  बंद करण्याची मागणी करणारा मुंबई पोलिसांचा अहवाल म्हणजे धूळफेक असून तो फेटाळण्याची मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी निषेध याचिकेद्वारे सत्र न्यायालयाकडे केली आहे.

 

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह घोटाळ्याशी संबंधित अन्य राजकीय नेत्यांची पोलिसांनी चौकशी केली नाही. याउलट राजकीय दबावाखाली आणि आरोपींना पाठीशी घालण्याच्या हेतूने पोलिसांनी घोटाळा झाला नसल्याचा दावा केला आहे, असा आरोप हजारे यांनी केला आहे.

 

पोलिसांच्या अहवालाला विरोध करणारी निषेध याचिका हजारे यांनी अ‍ॅड. सतीश तळेकर यांच्यामार्फत सत्र न्यायालयात दाखल केली आहे. हजारे यांनी सुरुवातीला उच्च न्यायालयात फौजदारी याचिका करत या घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया राबवण्याची सूचना न्यायालयाने केल्यानंतर हजारे यांनी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती; परंतु चार वर्षे उलटली तरी पोलिसांनी तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी केलेली नाही वा गुन्हाही दाखल केला नाही, असे हजारे यांनी दाखल केलेल्या याचिकेत नमूद केले आहे.

Exit mobile version