Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शाह यांचा चर्चेचा प्रस्ताव आंदोलक शेतकऱ्यांनी पुन्हा धुडकावला

नवी दिल्ली । वृत्तसंस्था । केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या पंजाब आणि हरयाणातील शेतकऱ्यांचा दिल्ली सीमेवर निषेध आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मांडलेला चर्चेचा प्रस्ताव या शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा धुडकाऊन लावला आहे.

संध्याकाळी सिंघू बॉर्डर येथे माध्यमांसमोर ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. शेतकऱ्यांनी स्पष्ट केलं आहे की, बुराडी येथील निरंकारी मैदानात आंदोलन करणार नाहीत तर सिंघू बॉर्डवरच ठिय्या आंदोलन करतील. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांकडून लेखी स्वरुपात चर्चेचं निमंत्रण मिळालं तरच चर्चा होईल असा पवित्राही त्यांनी घेतला आहे.

दरम्यान, दिल्लीच्या सीमेवर होत असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्ली जिल्ह्यात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. याशिवाय आज सकाळी पंजाबचे चार लोक सी हेक्सागन इंडिया गेटजवळील पंजाब भवनासमोर पोहोचले होते. या ठिकाणी ते कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणार आहेत. सध्या त्यांना बुराडी येथे पाठवण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. एकीकडे शेतकऱ्यांनी बुराडी येथे आंदोलन करण्यास नकार दिला आहे तर दुसरीकडे निरंकारी समागम मैदानात या आंदोलनासाठी जोरदार तयारी सुरु आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांचं आंदोलन आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या अटींदरम्यान दिल्लीचे गृहमत्री सत्येंद्र जैन यांनी मोठं विधान केलं आहे. शेतकऱ्यांशी चर्चेसाठी कोणत्याही प्रकारची अट असता कामा नये, लवकरात लवकर चर्चा व्हायला हवी. ते आपल्या देशाचे शेतकरी आहेत. त्यांना जिथे पाहिजे तिथे आंदोलनाची परवानगी मिळायला हवी असंही त्यांनी म्हटलं आहे.

Exit mobile version