Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शाहू महाराजांचे पाईक असाल, तर सारथी संस्था जिवंत ठेवण्याची जबाबदारी तुमची

पुणे : वृत्तसंस्था । “मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असतानाच, आता सारथी संस्थेमार्फत राबविला जाणार तारा दूत प्रकल्प बंद पडला आहे. शरद पवार साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, पण छत्रपती शाहू महाराजांचे पाईक असाल, तर सारथी संस्था जिवंत ठेवण्याची जबाबदारी तुमची आणि महाविकास आघाडी सरकारची आहे” असे सांगत खासदार संभाजीराजे यांनी शरद पवार आणि महा विकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.

तारादूत प्रकल्प पुन्हा सुरू करावा, या मागणीसाठी पुण्यातील सारथी कार्यालय बाहेर मागील सहा दिवसापासून सेवक बेमुदत ठिय्या आंदोलन करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज खासदार संभाजीराजे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन चर्चा देखील केली. त्यानंतर प्रसार माध्यमांसोबत बोलताना अनेक विषयावर भूमिका देखील त्यांनी मांडली.

यावेळी खासदार संभाजीराजे म्हणाले की, “सारथी संस्थेच्या माध्यमातून तारादूत प्रकल्प राबविला जात होता. मात्र आता तोच प्रकल्प मागील कित्येक महिन्यापासून बंद असल्याने, त्या प्रकल्प अंतर्गत काम करणार्‍या सेवकांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्या मागणीसाठी सहा दिवसापासून सेवक सारथी संस्थे बाहेर ठिय्या आंदोलन करीत आहे. मात्र याकडे या महा विकास आघाडी सरकारचे लक्ष नाही किंवा दखल देखील घेतली जात नाही. ही निषेधार्थ बाब असून या प्रश्न मी लवकरच शरद पवार साहेब, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. पण आज शरद पवार साहेबांचा वाढदिवस आहे. त्यांना शुभेच्छा देत असून ज्या छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने ही संस्था सुरू केली आहे. त्याकडे कोणाचे लक्ष नाही. त्यामुळे शरद पवार साहेब आपण छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचे पाईक असाल, तर ही सारथी संस्था जिवंत ठेवण्याची तुमची जबाबदारी आहे” अशी भूमिका त्यांनी मांडली.

ते पुढे म्हणाले की, सारथी संस्थेला स्वायत्तता देणार असा शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून दिला गेला. त्यानंतर दोन महिन्यांपूर्वी अजित पवार यांच्या विभागाने सारथी संस्थेला स्वायत्तता प्रदान देखील केली. मात्र सारथीचे अधिकारी कलम 25 च्या माध्यमातून आम्हाला स्वायत्तता असल्याचे सांगत आहेत. मग कसली स्वायत्तता असा सवाल उपस्थित करीत या आंदोलनकर्त्यांसाठी रस्त्यावर पुन्हा उभे राहावे लागेल असा इशारा देखील त्यांनी महाविकास आघाडी सरकारला त्यांनी दिला.

Exit mobile version