Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शास्त्री फार्मसी कॉलेजतर्फे जागतिक वेबिनार

 

एरंडोल, प्रतिनिधी । शास्त्री फाऊंडेशन संचालित शास्त्री कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयात “कठीण काळ टिकत नाही, टिकतात ते फक्त कठीण लोक” या विषयावर ऑनलाईन जागतिक वेबिनार आयोजित करण्यात आले.

कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून अमेरिकेतील जगप्रसिद्ध Novartis या औषधी कंपनीचे जागतिक प्रमुख डॉ. सुधाकर गरड यांनी झुम ॲपद्वारे व युट्युब लाईव्ह द्वारे भारतातील शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. डॉ. गरड यांनी सुद्धा ग्रामीण भागातून अगदी सामान्य परिस्थितीतून मार्गक्रम करीत एवढ्या मोठ्या हुद्द्यावर पोहोचले आहेत. अथक परिश्रम, चिकाटी आणि शिक्षणाचा ध्यास या गुणांद्वारे ग्रामीण भागातील विद्यार्थी सुद्धा जगात यशाचे अत्युच्च शिखर प्राप्त करू शकतो, गरज असते ती फक्त जिद्दीला पेटण्याची असे प्रतिपादन डॉ. गरड यांनी आपल्या स्वतःच्या अनुभवातून केले.

डॉ. गरड हे ग्रामीण भागातून आलेले असून संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. विजय शास्त्री यांचे ते वर्गमित्र होत. घरची अतीसाधारण आर्थिक परिस्थिती असताना सुद्धा त्यांनी अनेक अडचणींवर मात करून आज ते अमेरिकेतील Novartis या जगातील नामांकित कंपनीचे जागतिक प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांना आलेल्या अडचणी आणि त्यावर कशी मात केली याबाबतचे मार्गदर्शन केले.

विशेष म्हणजे सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांचे आत्महत्येचे प्रमाण फार वाढले आहे आणि यासाठी डॉ. गरड यांनी संयम राखून ध्येयवादी बनण्यासाठी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रा. राहुल बोरसे यांनी केले तर आभार प्रा. डॉ. विजय शास्त्री यांनी केले.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जो न्यूनगंड असतो की मी एवढ्या छोट्याशा गावातून शिकून काही विशेष किंवा काही वेगळे करू शकत नाही अश्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देण्यासाठीच या वेबिनार चे आयोजन केले होते असे प्रतिपादन डॉ. शास्त्री यांनी केले. संस्थेचे सचिव रूपा शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. जी.के.भोई, प्रा.जावेद शेख, प्रा. हितेश कापडणे, जनसंपर्क अधिकारी शेखर बुंदेले आणि समस्त कर्मचारी वर्ग यांचे सहकार्य लाभले.

Exit mobile version