Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ‘खेळ औषधांचा’ लाघुनाट्य सादर

जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  औषधी रुग्णांसाठी वरदान आहे, मात्र वैद्यकीय सल्ल्याशिवाय घेतले तर त्याचे शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात. असा महत्वाचा संदेश देणारे लघुनाट्य “खेळ औषधांचा” शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात विद्यार्थ्यांनी सादर केले.

 

“आझादी का अमृत महोत्सव” अभियानांतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील औषधशास्त्र विभागातर्फे “खेळ औषधांचा” हे लघुनाट्य सादर करण्यात आले. यावेळी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, उप अधिष्ठाता डॉ. किशोर इंगोले, उप वैद्यकीय अधिक्षक डॉ. योगिता बावस्कर, औषधशास्त्र विभाग प्रमुख डॉ. इमरान तेली मंचावर उपस्थित होते.

सुरुवातीला कार्यक्रम घेण्यामागील उद्देश डॉ. तेली यांनी सांगितला. यानंतर विद्यार्थ्यांनी लघुनाट्य सादर केले. नाट्यातून ओपीडीतील विद्यार्थ्यांनी रुग्ण व नातेवाईकांना संदेश दिला. ज्यांना दुर्धर व्याधी आहेत, गरोदर महिला आहेत त्यांनी कुठल्याही आजारावर परस्पर औषधी घेऊ नयेत. अन्यथा शरीरातील अवयवांवर परिणाम होऊ शकतो. मधुमेहींनी सतत काहीतरी खात राहिले पाहिजे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व दिलेल्या डोसनुसार औषधी घेतली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

प्रसंगी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी सांगितले की,  सामान्य नागरिकांसाठी औषधी घेणे हा अत्यंत महत्वाचा व जिव्हाळयाचा विषय आहे. विद्यार्थ्यांनी केलेली जनजागृती महत्वाची ठरणार आहे. सर्वसामान्यांच्या आयुष्यात औषधशास्त्राने महत्वाची भूमिका बजावलेली आहे, असेही ते म्हणाले.

सूत्रसंचालन व आभार डॉ. हर्षल महाजन यांनी  मानले. यावेळी डॉ. भाऊराव नाखले, डॉ. प्रवीण शेकोकार, डॉ. प्रशांत देवरे, डॉ. संगीता गावित, डॉ. मोनिका युनाती, डॉ. धनश्री पाटील, डॉ. शीतल सोमवंशी, डॉ. नेहा भंगाळे, डॉ. अमित भंगाळे उपस्थित होते. कार्यक्रमासाठी डॉ.रोहिणी अंकुशे, डॉ. शिल्पा मिश्रा, हेमंत जोशी, विनोद सोनवणे आदींनी परिश्रम घेतले.

 

Exit mobile version